महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

होलार समाजाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे • होलार समाजाच्या प्रतिनिधींसमवेत विविध प्रश्नांबाबत झाली बैठक ; बार्टीने नव्याने अभ्यास करण्याच्या सूचना

Summary

मुंबई, दि.२३ : होलार समाजाचा स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेवून या समाजातील विविध प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मंत्रालय येथे राज्यातील होलार […]

मुंबई, दि.२३ : होलार समाजाचा स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेवून या समाजातील विविध प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मंत्रालय येथे राज्यातील होलार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीत सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, बार्टीचे महासंचालक डॉ. धम्मज्योति गजभिये, आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, समाजकल्याण विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम देवळे, मानिकराव भंडगे यासह सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागातंर्गत उच्चस्तरीय समिती नेमून  होलार समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल. होलार समाजासंदर्भात बार्टीने नव्याने या जातींचा अभ्यास करावा. जातीच्या नोंदी जेंव्हा नव्याने केल्या जातील तेंव्हा त्या अगदी काटेकोरपणे करण्यावर भर द्यावा. या समाजाने महामानवाच्या यादीसाठी जी नावे सुचविली आहेत त्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी, स्टँड अप योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या समाजातील जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी नव्याने धोरण तयार करण्यात येत असून ते लवकरच जाहीर करणार असल्याचेही श्री.मुंडे यांनी सांगितले.

श्री.मुंडे म्हणाले, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राबविताना ज्या लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे त्यांना समन्यायी वाटप करावे याबाबत सामाजिक न्याय विभागाने सर्व जिल्हाधिकारी व समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त यांना पत्राद्वारे कळवावे. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये सर्वांना समन्याय देण्यात यावा अशा सक्त सूचना श्री.मुंडे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी होलार समाजासंदर्भात सद्य:स्थितीत  सुरू असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती बैठकीत दिली. होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम देवळे, यांनी यावेळी होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विविध सूचना मांडल्या, या समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र आयोग नेमावा, अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ,ब,क,ड वर्गवारी करून होलार समाजाला ठराविक आरक्षण मिळावे, जात पडताळणी होलार समाजातील वाजंत्री कलाकांरासाठी अनुदानाची शिफारस, मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहात होलार समाजातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात यावा, होलार समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे, राज्यस्तरावरील समितीमध्ये या समाजाचा प्रतिनिधी नेमणे, या समाजात उद्योजक तयार व्हावेत यासाठी शासनाकडून नव्याने योजना देण्यात याव्यात, अशा विविध सूचना होलार समाजाच्या प्रतिनिधींनी मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *