BREAKING NEWS:
महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

हेल्थ ॲप्लिकेशन व विविध सुविधा पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलिस दलाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ

Summary

अमरावती, दि. 20 : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल अहोरात्र कार्यरत असते. कोरोना काळातही त्यांनी जीवाची बाजी लावून अमूल्य योगदान दिले. अशा तणावपूर्ण आयुष्यात आरोग्य व मनाचा समतोल जपण्यासाठी योग- व्यायामाबरोबरच सकारात्मकता, तसेच ‘हेल्दी थिकिंग’ची आवश्यकता असते. त्यासाठी अमरावती […]

अमरावती, दि. 20 : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल अहोरात्र कार्यरत असते. कोरोना काळातही त्यांनी जीवाची बाजी लावून अमूल्य योगदान दिले. अशा तणावपूर्ण आयुष्यात आरोग्य व मनाचा समतोल जपण्यासाठी योग- व्यायामाबरोबरच सकारात्मकता, तसेच ‘हेल्दी थिकिंग’ची आवश्यकता असते. त्यासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस हेल्थ ॲप्लिकेशन व इतर उपक्रम महत्वपूर्ण ठरतील. यापुढेही दलाच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा चांगल्या उपक्रमांना शासनाकडून आर्थिक बळ मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्हा ग्रामीण पोलिस दलातर्फे आशियाना क्लब, जोग क्रीडासंकुल, पोलिस अधीक्षक कार्यालय नूतनीकरण तसेच पोलिस हेल्थ ॲपचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, श्रीमती श्वेता के. हरी बालाजी, अपर पोलिस अधिक्षक श्याम घुगे, डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, डॉ. अनिल रोहणकर, डॉ. स्वप्नजा निंभोरकर, पोलिस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, राखीव पोलिस निरीक्षक दीपक गेडाम आदी उपस्थित होते.

आशियाना क्लब येथे व्हीआयपी कक्ष, विश्राम कक्ष, पोलिस अधिक्षक कार्यालयात जलद प्रतिसाद पथक व दंगा नियंत्रण पथक, पुरुष व महिला बराक, ग्रामीण अधिकारी, अंमलदारांसाठी मेस, स्मृतिभवन, उपाहारगृह, तर जोग स्टेडियम येथे वॉकिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, लॉन टेनिस कोर्ट, कबड्डी मैदान, मंथन सभागृह, अन्नपूर्णा मेस, बॉईज बराक, 400 मीटर ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट आदी विविध सुविधांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला. श्रीमती श्वेता के. हरी बालाजी यांनी या सुविधांच्या नूतनीकरण व निर्मितीसाठी योगदान दिले आहे. दलासाठी 12 बलेरो व 18 बाईक या वाहनताफ्याचा शुभारंभही यावेळी झाला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस कर्मचा-यांसाठी पोलिस हेल्थ ॲप, क्लब व क्रीडा संकुलात सभागृह, विश्राम कक्ष, उपाहारगृह, महिलांसाठी स्वतंत्र जीम अशा अनेक उत्तमोत्तम सुविधा निर्माण झाल्या आहेत. पोलिस अधिक्षक हरी बालाजी यांनी धडाडीने या सुविधा अंमलात आणल्या हे निश्चित वाखाणण्यासारखे आहे. यापूर्वीही रक्षादीपसारखा चांगला उपक्रम राबवला गेला. पोलिस कर्मचा-यांवरील महत्वाच्या जबाबदाऱ्या, अविश्रांत काम व तणाव पाहता त्यांच्या आरोग्य व मनोबल टिकवून ठेवण्यासाठी ॲपसह हे विविध उपक्रम उपयुक्त ठरतील. अशा अनेकविध उपक्रमांना पोलिस दलाने चालना द्यावी. चांगल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. श्री. बालाजी यांनी कल्पकता व धडाडीने स्टेडियम, क्लब येथील सुविधांचे सौंदर्यीकरण करून त्यांचा दर्जा उंचावला, असे श्री. वैद्य यांनी सांगितले.

पोलिसांच्या आरोग्याचा ताळेबंद राखणारे ॲप

ॲपमध्ये सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची मेडिकल हिस्टरीची नोंद होणार असून, सर्वांच्या आरोग्याचा ताळेबंद निर्माण होणार आहे. त्यानुसार उपचार सुविधा, आरोग्य सल्ला देण्यात येणार आहे. फिजिशियन, सर्जन आदी तज्ज्ञांच्या मदतीने दक्षता, उपचार सुविधांबाबत मार्गदर्शन करणारे हे ॲप तयार करण्यात आले.  सकारात्मक जीवनशैली, मानसिक व्यवस्थापन, व्यायाम, योग याबाबतही ते मार्गदर्शक ठरणार आहे. इंग्रजी व मराठीत दोन्ही भाषांत ॲप उपलब्ध आहे, असे श्री. बालाजी यांनी प्रास्ताविकात सांगितले. निवेदिका क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. अपर पोलिस अधिक्षक श्याम घुगे  यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *