हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मसाल्यांचे जी २० परिषदेत प्रदर्शन

मुंबई, दि. 29 : पाच लाख रूपये किलो किमतीचे केसर तसेच सहा हजार रूपये किलो किमतीची वेलची जी-20 परिषदेसाठी मुंबईत आलेल्या कार्यगटाच्या सदस्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईत जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता आलेल्या सदस्यांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात केंद्र शासनाच्या स्पाइस बोर्डच्या माध्यमातून भारतातील हजारो वर्षांची परंपरा असलेले मसाले प्रदर्शित करण्यात आले आहेत.
या विषयी माहिती देताना स्पाइस बोर्डाचे विपणन संचालक बसिस्थ नारायण झा यांनी सांगितले की, सुमारे 180 देशांमध्ये निर्यात होणाऱ्या या मसाल्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे. 800 प्रकारचे मसाले, त्यांचे अर्क, मिश्रण आदींना जगभरात मागणी आहे. पोषक घटक पदार्थ, आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधने यात हे पदार्थ वापरले जातात. जगात मसाल्यांच्या व्यवसायाची सुमारे 33 हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. यापैकी 47 टक्के एवढा व्यापार एकट्या भारतातून होतो. याबाबतची अधिक माहिती http://www.indianspices.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जी – 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ, भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे.
00000