BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

स्वामीनाथन आणि टाटा फाऊंडेशन सोबतच्या कराराने राज्यात शेती, ग्रामविकासाचे नवे पर्व – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summary

मुंबई, दि. ०६ : कृषी विभाग, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन,  ग्रामविकास विभाग आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यासोबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांमुळे राज्यात शेती, महिला  सक्षमीकरण, पोषण सुरक्षा आणि ग्रामीण विकास क्षेत्रांमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

मुंबई, दि. ०६ : कृषी विभाग, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन,  ग्रामविकास विभाग आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यासोबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांमुळे राज्यात शेती, महिला  सक्षमीकरण, पोषण सुरक्षा आणि ग्रामीण विकास क्षेत्रांमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त  केला. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे सामंजस्य करार झाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनामार्फत शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास प्राधान्य दिले जात आहे. महिला शेतकरी हा शेती व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या सहभागातून आपण केवळ उत्पादन नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करू शकतो. पोषण सुरक्षा ही काळाची गरज असून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देत असताना भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठीही हा उपक्रम उपयोगी ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामविकास विभागासोबत टाटा मोटर्स यांच्यासमवेत झालेला सामंजस्य करार ग्रामीण विकासाला गती देणारा आहे. या कराराच्या माध्यमातून ६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रभावी काम होईल आणि त्यातून पुढील काळात स्केलअप करता येईल असा साचा तयार होईल. तसेच ग्रामविकास विभागाच्या समृद्ध ग्राम मिशनला या सामंजस्य  करारामुळे चालना मिळेल. गावांच्या शाश्वत विकासासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी या उपक्रमांमधून सक्षम पायाभूत रचना उभारली जाईल.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, महाराष्ट्राच्या कृषी दृष्टीकोनाला फक्त अन्नसुरक्षेपुरते मर्यादित न ठेवता पोषण सुरक्षा, पर्यावरणीय टिकाव आणि शेतकरी समृद्धी हे व्यापक उद्दिष्ट साध्य करणे हा कराराचा उद्देश आहे. “बायोहॅपिनेस” आधारित शाश्वत शेती या सामंजस्य करारामधील मधील प्रमुख संकल्पना आहे. यात, संरक्षण, लागवड, खरेदी आणि विपणन या घटकांवर अधिक भर देण्यात आला आहे.

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ​एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. सौम्या स्वामिनाथन, टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

कृषी विभाग व  एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन यांच्यामधील सामंजस्य करार

वातावरणीय बदल व पोषण मूल्यांचा विचार करता पारंपरिक व स्थानिक अशा भरड धान्यांच्या उत्पादन व प्रक्रिया शेती उद्योगांना प्रोत्साहन देणे.

संयुक्त राष्ट्राने २०२६ हे महिला शेतकरी वर्ष घोषित केलेले आहे. त्या निमित्ताने महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी कायद्याची निर्मिती. तसेच सावित्रीबाई फुले महिला शेतकरी सशक्तीकरण अभियानाची निर्मिती.

पर्यावरणपूरक, पोषक, जैवविविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये बायोहॅपिनेस केंद्रांची निर्मिती.

टाटा मोटर्स फाऊंडेशन व ग्रामविकास विभाग यांच्यामधील सामंजस्य करार

पालघर जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये राबवविलेल्या एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यभरातील ६३ ग्रामपंचायतींमध्ये (१०० गावे) हा कार्यक्रम राबवविला जाणार.

शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास पूरक असा हा कार्यक्रम आहे. राज्यातील १० आकांक्षित तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाईल.

निवडलेल्या प्रत्येक गावात तीन वर्षांच्या कार्यक्रम कालावधीत ग्रामपंचायत व स्थानिक समुदायांच्या सक्षमीकरणातून गावांचा शाश्वत विकास साधणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रम कालावधीच्या अखेरीस संबंधित गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांना शासकीय सेवा व योजनांचा १०० टक्के लाभ मिळालेला असेल.

विविध शासकीय योजना व कार्यक्रमांच्या तसेच टाटा मोटर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अभिसरणातून हा कार्यक्रम राबवविला जाईल. शासकीय कार्यक्रमांच्या परिणामकारकतेत वाढ करण्यासाठी प्रामुख्याने सामाजिक उत्तरदायित्व निधी उपयोगात आणला जाईल.

ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी व आराखड्याच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *