स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करणार – पालकमंत्री बच्चू कडू यांची घोषणा
Summary
अकोला,दि.१५(जिमाका)- भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येईल. यानिमित्ताने सामान्य माणसांचे प्रश्न अजेंड्यावर घेऊन त्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असेल,अशी घोषणा राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू […]
अकोला,दि.१५(जिमाका)- भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येईल. यानिमित्ताने सामान्य माणसांचे प्रश्न अजेंड्यावर घेऊन त्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असेल,अशी घोषणा राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केली. जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ ना. बच्चू कडू यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
उपस्थित मान्यवर
या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपवनसंरक्षक अर्जूना, अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री तसेच सर्व सदस्य व सर्व यंत्रणा प्रमुख , माजी आमदार तुकाराम बिडकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, तसेच स्वातंत्र्य सैनिक, शहिदांचे कुटुंबीय, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री ना. कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पोलीस वाद्यवृंदाने वाजवलेल्या राष्ट्रगीताच्या धुनवर राष्ट्रध्वज वंदना करण्यात आली.
स्वातंत्र्य सैनिक व शहिदांचे स्मरण
त्यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या संबोधनात सर्वप्रथम देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्य सैनिक, देशाच्या संरक्षाणासाठी प्राणांचे बलिदान देणारे सिमेवरील जवान, शहीद यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
तिसऱ्या लाटेसाठी सज्जता
यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, सेवाभावी संस्था यांनी चांगले काम केले. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठी जोखीम होती, मात्र गेल्या वर्षभरात प्रयत्नपूर्वक ऑक्सिजन पुरवठ्याबाबत परिपूर्णता करुन कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सज्ज आहे. खरेतर ही तिसरी लाट येऊच नये अशी प्रार्थनाही आपण करु,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आगामी वर्ष ‘सेवा वर्ष’
ते पुढे म्हणाले की, आपण सारेजण तिरंग्याचे पाईक आहोत. राष्ट्र प्रथम या विचारातून आपण कार्यरत राहू. स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’, म्हणून साजरे करु. जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावतांनाच सामान्य माणसांच्या हिताचे विषय अजेंड्यावर घेऊन मार्गी लावण्यासाठी आपण व आपले प्रशासन कार्य करेल. बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी ‘गाडगेबाबा घरकुल’ हा प्रकल्प कार्यान्वित करु. अनाथांनाही हक्काचे घर देणार. सामान्य नागरीकांपर्यंत प्रशासनाच्या सेवा पोहोचविण्यासाठी ‘पालकमंत्र्यांची राहुटी आपल्या गावात’, हा उपक्रम राबविणार. देशाचा नागरिक हा बलशाली असावा तसेच तो नागरिक तक्रारमुक्त, चिंतामुक्त व आरोग्य युक्त असावा यासाठी प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज राहिल,असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
विविध पुरस्कारांचे वितरण
कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरणही ना. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा युवा पुरस्कार
जिल्हा युवा पुरस्कार (संस्था)-
कार्यकमाचे सूत्रसंचालन शेखर गाडगे यांनी केले. या सोहळ्याचे जिल्हा माहिती कार्यालय अकोला यांनी फेसबुक पेजवरुन थेट प्रसारण केले.
०००००
क्रीडापटूंनी अधिकृत संघटनांच्या माध्यमातून सहभागी व्हावे-पालकमंत्री बच्चू कडू
खेळाडूंनी अधिकृत क्रीडा संघटनांच्या मार्फतच खेळाडूंनी स्पर्धात सहभाग घ्यावा, त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्कात रहावे,असे आवाहन पालकमंत्र्यांनी खेळाडूंना केले.तसेच तालुका क्रीडा संकुलांचा वापर अधिकाअधिक प्रमाणात कसा करता येईल, यासाठी धोरण आखण्यात यावे,असेही निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले तसेच गरीब खेळाडूंच्या पौष्टिक आहारासाठी आपल्या मानधनातील दोन लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात गुणवत्ताधारक खेळाडूंशी ना.कडू यांनी आज हितगुज केले. गुणवत्ताधारक खेळाडुच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ना.कडू यांनी बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे आदी उपस्थित होते. यावेळी खेळाडूंनी आपल्याला येत असलेल्या अडचणींची माहिती पालकमंत्र्यांना दिली. यात खेळाची साधने, आवश्यक आहार, वरिष्ठ पातळीवर खेळावयास जाण्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य इ.प्रकारच्या अडचणींची माहिती देण्यात आली.
यावेळी खेळाडूंनी अधिकृत क्रीडा संघटनांच्या मार्फतच खेळाडूंनी स्पर्धात सहभाग घ्यावा, त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्कात रहावे,असे आवाहनही पालकमंत्र्यांनी खेळाडूंना केले.तसेच तालुका क्रीडा संकुलांचा वापर अधिकाअधिक प्रमाणात कसा करता येईल, यासाठी धोरण आखण्यात यावे,असेही निर्देश ना.कडू यांनी दिले.
०००००
जिल्ह्यात राबविणार व्यसनमुक्ती अभियान – स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री बच्चू कडू यांचा संकल्प
एक व्यसनाधीन व्यक्ती हा त्या कुटुंबातील व्यक्तींच्या आणि पर्यायाने समाजाच्या प्रगतीला मारक ठरू शकतो, समाजाची ही अशाप्रकारची अधोगती थांबविण्यासाठी जिल्ह्यात व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा संकल्प पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त येथे केला.
यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी ना.कडू म्हणाले की, समाजात व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढू नये, तसेच भावी पिढी ही व्यसनांच्या विळख्यात येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आता सध्या समाजात जे व्यसनाधीन व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींची माहिती ग्रामीण भागात पोलीस पाटील व शहरात पोलीस स्टेशननिहाय घेण्यात यावी. व्यसनाधीन व्यक्ती व्यसनांच्या किती आहारी गेली आहे,त्याचे प्रमाण पाहून त्यांना औषधोपचार व समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देता येईल. यासाठी पोलीस स्टेशननिहाय माहिती सादर करावी,असे निर्देशही ना.कडू यांनी यंत्रणेला दिले.
या माध्यमातून व्यसनमुक्तीचे एक चांगले मॉडेल विकसित करण्याचा आपला मनोदय असल्याचे ना.कडू यांनी स्पष्ट केले.
००००००००००
शहिदांच्या कुटुंबियांसमवेत पालकमंत्र्यांचे स्नेहभोजन; आली कृतज्ञतेची प्रचिती
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हणतात, पण आज ह्या पूर्णब्रह्मालाही कृतज्ञता वाटावी,अशी प्रचिती देणारे औचित्य पालकमंत्री बच्चू कडू यांनी साधले. निमित्त होते शहिद कुटुंबियांसमवेत स्नेह भोजनाचे! शहिदांचे वारस, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, पुत्र, कन्या यांच्या ‘वदनी’ गेलेला हा पूर्णब्रह्माचा ‘कवळ’ स्वतःलाच धन्य मानत होता!
स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहिदांच्या कुटूंबियांसमवेत पालकमंत्र्यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले. त्यात स्वतः पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या हातांनी जेवण वाढलं. जिल्हाधिकारी, प्रशासनातले इतर अधिकारीही वाढपी झाले. थाटामाटात म्हणावा असा हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. खरंतर शहिदांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची ही एक संधी होती, आणि स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचे हे औचित्य अधिक औचित्यपूर्ण झालं.
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शहिदांच्या कुटुंबियांच्या विषयावर प्राधान्याने काम करीत आहेत. त्यांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत ते अधिक जागरुक आहेत. प्रशासनातल्या प्रत्येकाने असं जागरुक असावं, याबद्दलही ते आग्रही आहेत. यासाठी जिल्ह्यातील २८ शहिद कुटुंबियांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी त्यांनी घेतल्या. त्यांची अडीअडचण जाणून घेतली. त्यापैकी अनेकांचे प्रश्न मार्गीही लागलेत.
पालकमंत्र्यांच्या या संवेदनशीलतेची प्रचिती आजच्या शहीद कुटुंबियांसमवेत स्नेहभोजन या कार्यक्रमातून आली. वीरमातांचे पाय स्वतः पालकमंत्र्यांनी धुतले. या स्नेहभोजनाचा थाट मोठा होता. प्रत्येक वीर माता, वीर पिता , वीर पुत्र, वीर कन्या, वीर पत्नी ह्यांना सन्मानाने बसविण्यात आले. स्वतः पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रशासनातले उच्च अधिकारी वाढपी झाले. पालकमंत्र्यांनी आपल्या मनोगतात सांगितले त्याप्रमाणे ‘ तुमच्या सोबत जेवणाची संधी मिळाली, हे आमचे भाग्य’, त्यामुळे सर्वांचे सर्व अभिनिवेश गळून पडले. स्वतः ‘पूर्णब्रह्म’ असलेले ‘अन्न’ ही देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांच्या वारसांच्या, अशा वीर पुत्रांना जन्म देणाऱ्या माता पितांच्या तोंडी जाऊन धन्य होत होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह अनेक अधिकारीही उपस्थित होते.