स्मार्ट मीटर सक्तीविरोधात बहुजन समाज पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
Summary
लाखांदूर:- तालुक्यात स्मार्ट मीटर विरोधात तीव्र रोष असून यासंदर्भात राज्य सरकारने स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द केल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात याबाबत कोणताही शासन निर्णय (जीआर) काढण्यात आलेला नाही. महावितरणकडून सध्या तालुक्यात स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरूच आहे. ही […]
लाखांदूर:- तालुक्यात स्मार्ट मीटर विरोधात तीव्र रोष असून यासंदर्भात राज्य सरकारने स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द केल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात याबाबत कोणताही शासन निर्णय (जीआर) काढण्यात आलेला नाही. महावितरणकडून सध्या तालुक्यात स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरूच आहे. ही कारवाई जनतेची दिशाभूल करत असून, ग्राहकांवर अनावश्यक आर्थिक बोजा वाढवण्याचा प्रकार आहे. – चेतन बोरकर, बसपा तालुकाध्यक्ष लाखांदूर
लाखांदूर- लाखांदूर तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या सक्तीविरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर बसविण्याच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक ताण येणार असून, या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ग्राहकांना अनावश्यक आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. यामुळे गरीब व सामान्य वर्गाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच, स्मार्ट मीटरच्या स्थापनेमुळे वीज बिलामध्ये अनियमितता, प्रायव्हसी आणि सुरक्षा यासारख्या गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.
मुख्य मागण्या:
1. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी.
2. ग्राहकांना परंपरागत मीटर कायम ठेवण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा.
3. स्मार्ट मीटरचा खर्च ग्राहकांवर लादू नये.
4. या संदर्भात स्पष्ट शासन निर्णय (जीआर) काढावा.
5. महावितरणकडून सुरू असलेली स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवावी.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर जनतेच्या हक्कांसाठी मोठे आंदोलन उभारले जाईल. लाखांदूर तालुक्यात या निर्णयाविरोधात तीव्र रोष असून, ग्राहकांच्या हितासाठी राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वरील निवेदन तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले असून, यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी बसपा तालुकाध्यक्ष चेतन बोरकर, बसपा साकोली विधानसभा महासचिव चंद्रहास चव्हाण, प्रमोद बारसागडे, चंद्रमणी गोंडाणे जिल्हा प्रभारी बसपा, गणेश सोनापिंपळे ,सुयोग जांभूळकर, राजन मेश्राम, सुमेध बारसगडे, प्रज्वल बारसागडे, महेंद्र शेंडे, प्रशांत तरारे, शंकरजी हुमने उपाध्यक्ष बसपा, पंकज बांबोरे, युवराज हूमणे, प्रदुमन दिघोरे, सुधाकर खते इत्यादी बसपा कार्यकर्ते उपस्थित होते.