सोलापूर : रुग्णांची माहिती लपविणा-या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचा आयुक्तांचा इशारा
*सोलापूर* शहरात मागील दिवसापासून पाच हजार 155 रुग्ण वाढले असून, त्यांतील 165 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूदर वाढण्याच्या कारणांचा शोध आता खुद्द महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनीच घ्यायला सुरुवात केली आहे. एखाद्या खासगी डॉक्टरांनी त्या रुग्णाची माहिती लपवून, लक्षणे असतानाही कोरोना टेस्ट न करताच त्यांच्यावर परस्पर उपचार केल्याचे लक्षात आल्यास संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, अनेकजण सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असतानाही कोरोना टेस्ट करून घेत नसल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे शहरातील अनेक रुग्णालयांत तसे रुग्ण परस्पर किरकोळ उपचार घेऊन घरी परत जात आहेत.
काही दिवसांनी आजार वाढल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येत असून, अशा रुग्णांचाच मृत्यू होत असल्याची बाब निदर्शनास येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मृत्यूदर कमी करून कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्तांनी कंबर कसली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आयुक्तांनी खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र आदेश काढून त्यांना सक्त सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांच्याकडे येणाऱया रुग्णांची नोंद दररोज ठेवावी, कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांची उपचारांपूर्वी कोरोना टेस्ट करावी अथवा त्यांची माहिती जवळील नागरी आरोग्य केंद्राला द्यावी, असे निर्देश दिले होते. मात्र, काही रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नोंदी अद्ययावत नाहीत, काही रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपचारांसाठी आलेल्या रुग्णांची कोरोना टेस्ट न करताच त्यांच्यावर तात्पुरते इलाज केल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली. त्यामुळे आयुक्तांनी आता खासगी रुग्णालयांवरच कारवाई सुरू केली आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535