कृषि चन्द्रपुर महाराष्ट्र शिक्षण हेडलाइन

सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ आणि वनविद्या महाविद्यालयासाठी शासन सकारात्मक – पालकमंत्री विजय वडेट्टीवार कृषी दिनी शेतकऱ्‍यांशी साधला संवाद

Summary

वसंतराव नाईकांमुळेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी चंद्रपूर,दि. 1 जुलै :  अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षात या विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाही येथे नवीन कृषी विद्यापीठ निर्माण करण्याला आपले प्राधान्य आहे. तसेच […]

वसंतराव नाईकांमुळेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी

चंद्रपूर,दि. 1 जुलै :  अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षात या विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाही येथे नवीन कृषी विद्यापीठ निर्माण करण्याला आपले प्राधान्य आहे. तसेच हा संपूर्ण परिसर वनांनी व्यापला असल्यामुळे येथे लवकरच वनविद्या महाविद्यालय सुरू करण्यात येईल. या दोन्ही बाबतीत शासन सकारात्मक आहे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

हरीतक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतक-यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जि. प. समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, जि.प. सदस्य रमाकांत लोधे, पं.स.सभापती मंदा बाळबुधे, उपसभापती शिला कन्नाके, मधुकर मडावी, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. कोल्हे, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. नागदेवते, शास्त्रज्ञ स्नेहा वेलादी, डॉ. सिडाम, प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी वसंतराव नाईक यांच्या काळात झाली, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, त्यानंतर वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारण, पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखे अभिनव उपक्रम राबविले. त्यामुळेच प्रगत शेतीमध्ये महाराष्ट्राचा देशात अव्वल क्रमांक आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याचा काही भाग अशा पाच जिल्ह्यातून 65 लक्ष टन धानाचे उत्पन्न होते. शेतकरी सुखी होण्याची ही वाटचाल आहे.

सिंदेवाही येथे कृषी विद्यापिठाच्या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक आहे. येत्या दोन-तीन वर्षात येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करणे, हे आपले प्रथम प्राधान्य आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या जागेवर वनविद्या महाविद्यालय स्थापन झाल्यास वनउपजांपासून शेतीला पुरक औषधी निर्माण होईल. त्याचे संशोधन या महाविद्यालयात केले जाईल. अनेक कृषी शास्त्रज्ञ येथे येण्यासाठी तयार आहेत. वनविद्या महाविद्यालयाचा 182 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

बियाणे निकृष्ट असले तर शेतकरी अडचणीत येतो. त्यातच मावा, तुडतुडे आदी किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त असतो. त्यामुळे आता रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय शेती करणे आवश्यक आहे. रोहणी यंत्र व कृषी यांत्रिकीकरणासाठी 35 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी दिनेश शेंडे आणि गुरुदास मसराम या शेतक-यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री. महाले, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री. कांबळे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

 

सिंदेवाही शहरासाठी 27 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

विविध विकास कामांचे भूमिपूजन

चंद्रपूर,दि. 1 जुलै :  सन 2022 पर्यंत सर्वांच्या घरी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सिंदेवाही शहरासाठी आसोलामेंढातून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी 27 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

नगर पंचायत सिंदेवाहीच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि स्थानिक आमदार निधीमधून नगर पंचायतीकरीता प्राप्त शववाहिनी आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी नगर पंचायत अध्यक्षा अशा गंडाटे, उपाध्यक्ष स्वप्नील कावळे, महिला व बालकल्याण सभापती नंदा बोरकर, जि.प.सदस्य रमाकांत लोधे, लोनवाहीच्या सरपंच नेहा समर्थ, पं.स.सदस्य राहुल पोरेड्डीवार, प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते.

सुंदर सिंदेवाही करण्याचा आपला मानस असून शहराच्या विकासासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, येत्या दोन – तीन महिन्यांत सिंदेवाहीसाठी 85 लक्ष रुपयांची अग्निशमन गाडी येणार आहे. नगर पंचायत इमारतीकरीता तीन कोटी तर संरक्षण भिंतीकरीता एक कोटी मंजूर करण्यात आले आहे. शहराच्या सौंदयीकरणात भर देण्यासाठी उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सिंदेवाहीतील नागरिकांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहरात विविध ठिकाणी 1 कोटी 84 लक्ष रुपये खर्च करून 16 वॉटर एटीएम लावण्याचे प्रस्तावित आहे.

भविष्यात संपूर्ण शहराचा जलद गतीने विकास होण्यासाठी लोणवाही ग्रामपंचायत सिंदेवाही नगर पंचायतीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे. शहर सुंदर झाले की व्यापार वाढतो, या तत्वानुसार सर्वांगीन विकासासाठी आपले प्रयत्न आहेत. याशिवाय शहर सौंदर्यीकरणअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांचे 30 ते 35 फुटांचे पुतळे उभारण्यात येतील. सिंदेवाही क्रीडा संकूलासाठी 5 कोटी 60 लक्ष रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली असून पुढील महिन्यात कामाला सुरवात होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी वातानुकुलीत अभ्यासिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. या अभ्यासिकेसाठी 4 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. पंचायत समितीच्या इमारतीकरीता 9 कोटी रुपये आणि 50 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयासाठी 12 कोटींचा निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून इमारतीची दुरुस्ती व वर्कशॉपच्या किरकोळ डागडूजीकरीता त्वरीत प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना प्राचार्यांना दिल्या. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, सा. बां. विभागाचे अभियंता माधव गावड, आयटीआयचे प्राचार्य प्रमोद चोरे आदी उपस्थित होते.

अशी आहेत विकासकामे : सिंदेवाही नगरपंचायत अंतर्गत प्रभागातील विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व नाली बांधकाम करण्यासाठी  रुपये 1 कोटी 50 लाख 67 हजार इतका निधी खनिज विकास निधीतून   उपलब्ध करून देण्यात आला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंदेवाही येथील मुख्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याकरीता 5 कोटी 89 लक्ष इतका निधी, मौजा अंतरगाव आणि नवरगाव येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी एकूण 60 लक्ष इतका निधी, चिमूर-पेंढरी- नवरगाव- अंतरगाव- सिंदेवाही आरमोरी रस्ता रा.मा.322 मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 3 कोटी रुपयाचा निधी, नवरगाव ते मिंनघरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 30 लक्ष इतका निधी, मौजे नवरगाव येथे वाल्मिकी सभागृहाच्या बांधकामाकरीता 15 लक्ष,‍  सिंदेवाही तालुक्यातील मौजे रत्नापूर येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्याकरीता 30 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *