सावधान! ऑनलाईन नफ्याच्या आमिषाने भंडाऱ्याच्या व्यक्तीला २२ लाखांचा गंडा; सायबर पोलिसांत ‘तमन्ना मिर्झा’वर गुन्हा दाखल! घरबसल्या कमाईचे स्वप्न पडले महागात; सायबर भामट्यांनी रचले होते मायाजाल
भंडारा:
सोशल मीडिया आणि ऑनलाईन बिझनेसच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या आता अधिक सक्रिय झाल्या आहेत. भंडाऱ्यातील एका व्यक्तीला ऑनलाईन बिझनेसच्या नावाखाली तब्बल २२ लाख ८ हजार ७६६ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी ‘तमन्ना मिर्झा’ नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास यंत्रणा कामाला लागली आहे.
नेमके प्रकरण काय?
भंडारा येथील अपूर्वा ले-आऊट, भोजापूर येथील रहिवासी अरविंद देवीदास दहिवले यांना ३१ जानेवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एका मोठ्या फसवणुकीचा सामना करावा लागला. आरोपी मोबाईल वापरकर्ती तमन्ना मिर्झा हिने त्यांना ‘मेमससमतेीवच’ (Memssamateevch) कंपनीमार्फत ऑनलाईन बिझनेस करून मोठा नफा कमविण्याचे प्रलोभन दिले.
असे रचले फसवणुकीचे जाळे
आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी काही बनावट आणि खोटे कागदपत्रे दाखवली. जास्तीच्या नफ्याच्या मोहापायी अरविंद दहिवले यांनी आरोपीने सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण २२,०८,७६६ रुपये जमा केले. मात्र, पैसे जमा केल्यानंतर कोणतीही परतावा मिळाला नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलिसांची धडक कारवाई
फिर्यादी अरविंद दहिवले यांच्या लेखी तक्रारीवरून भंडारा सायबर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ०५/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(क) नुसार करण्यात आली आहे.
या हायप्रोफाईल फसवणुकीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णकुमार राजेंद्रप्रसाद तिवारी अत्यंत गांभीर्याने करत आहेत.
पोलीस योद्धा न्यूज आवाहन: अनोळखी व्यक्तीने ऑनलाईन बिझनेस किंवा गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवल्यास त्याला बळी पडू नका. कोणत्याही बँक खात्यात पैसे जमा करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पहा.
वृत्त संकलन: अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
