सावकारी पाशात अनेकांचा जीव टांगणीला ‘त्या’ अवैध सावकाराने बळकावले शेती, घर, प्लॉट

लाखनी, (ता. प्र.). शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाखनी तालुक्यात सावकारी पाशात अनेकांचा जीव टांगणीला असून पैशाच्या जोरावर मुद्रांकाच्या मदतीने शेत-जमीन, घर, प्लॉट अशी मालमत्ता मुद्दत व कायम खूशखरेदी करून बळकावणाऱ्या अवैध सावकारावर कारवाई कधी होणार? मुद्दत व कायम खूशखरेदीचा प्रश्न गंभीर असल्यामुळे प्रशासन आपली भूमिका कधी घेणार? अवैध सावकारीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्धवस्त होत आहेत. व्याजाच्या जाळ्यात अडकलेल्या लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना आपली शेती, घर, आणि प्लॉट गमवावे लागत आहे. तालुक्यासह शहरात अवैध सावकारी बोकाळली आहे. कर्जाच्या नावाखाली अनेकांना आपली मालमत्ता गमवावी लागत आहे.
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एका गावच्या अवैध सावकाराने लाखनी तालुक्यातील ग्राम रेंगेपार/कोठा येथील एका शेतकऱ्याची शेतजमीन बळकावली तर ग्राम सोमलवाडा येथील एकाचे प्लॉट बळकावले आहे. तसेच लाखनी शहरतील एकाचे मकान यासोबतच एका सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीचे गडेगाव येथील असलेला प्लॉट देखील बळकावला आहे. अशा घटना आता सर्वत्र समोर येत आहेत. सावकारीविरोधी कायदे अस्तित्वात असले तरी, स्थानिक प्रशासन आणि
पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी ऑक्टोबर 2023 साली जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्यामार्फत सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन दिले होते.
अवैध सावकाराचे जाळे लाखनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या विरोधात कुणी आवाज उठवला तर धमकी दिली जाते. त्यामुळे सामान्य नागरिक तक्रार करायला टाळतात. यामुळे या अवैध सावकाराचे फावले आहे. परिणामी अनेक कुटुंबे बेघर झाली असून काहींनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही समोर येत आहेत. अवैध सावकारीच्या जाळ्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून या सावकारांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्जदारांना न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.