महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

सार्वजनिक वाहतूक नीटनेटकी, दर्जेदार असणे चांगल्या परिवहन व्यवस्थेचा कणा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एमएमआरडीएच्या ‘सर्वंकष परिवहन अभ्यास २’ या अंतिम अहवालाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Summary

एमएमआरडीएने केला मुंबईतील भविष्यकालिन परिवहनाचा अभ्यास  मुंबई, दि. 28: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ, नीटनेटकी व उत्तम दर्जाची असेल तर लोकांचा त्यावरचा विश्वास वाढून चांगली परिवहन व्यवस्था आकारास येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करून […]

एमएमआरडीएने केला मुंबईतील भविष्यकालिन परिवहनाचा अभ्यास 

मुंबई, दि. 28: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ, नीटनेटकी व उत्तम दर्जाची असेल तर लोकांचा त्यावरचा विश्वास वाढून चांगली परिवहन व्यवस्था आकारास येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करून भविष्यातील मुंबई महानगराचा वाहतूक आराखडा तयार करतांना सार्वजनिक वाहतुकीचे स्थान मोठे आहे असेही ते म्हणाले. एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास 2 या अंतिम अहवालाचे प्रकाशन आज मुख्यमंत्र्यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील भविष्यातील परिवहन व्यवस्थेसंदर्भात सूचना केल्या.

आज सह्याद्री येथे याच विषयावर आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी महानगर आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास यांनी प्रास्ताविक केले.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की,  एमएमआरडीएच्या कामांना अधिक गती देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल. शहरांचा विकास करताना आपण चटई क्षेत्र निर्देशांक वाढवून देतो पण रस्ते एकदा बांधले की बांधले, आपण त्यासाठी काही करीत नाही. कुणालाही गर्दीत आपली गाडी चालविण्याची हौस नाही. वाहतूक व्यवस्था ही शरीरातल्या रक्तवाहिन्यांसारखी असून रस्ते पूर्णपणे खड्डे मुक्त, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीटनेटकी व कार्यक्षम तसेच वेगवान असणे याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. कोरोना काळात बसेस, रेल्वेमधील प्रवासी संख्या घटली असेल पण आता परत वाढत चालली आहे असा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, सुविधा वाढवतांना पर्यावरणाला मारू नका. आपण खरोखरच किती आणि कसा नियोजनबद्ध विकास केला हे पाहायला पाहिजे. जिथे असा विकास झालेला नाही तिथेही आपल्याला कर्तव्य म्हणून पाणी, रस्ते, ड्रेनेज अशा सुविधा द्याव्या लागतात. आता मुंबईतली मेट्रो स्थानके पाहिली म्हणजे आपण मुंबईत आहोत की दुसऱ्या देशात असे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कुठलाही त्रास आणि अडथळ्याशिवाय प्रवास करण्याचे स्वप्न एमएमआरडीएच्या या नव्या अभ्यासातून पूर्ण होणार आहे अशी मला खात्री वाटते.

नागरी सुविधांवर लक्ष द्यावे -एकनाथ शिंदे 

यावेळी बोलतांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अमेरिकेचे उदाहरण देऊन सांगितले की, आपले रस्ते आपली खरी श्रीमंती दाखवतात. मुंबई आणि मुंबई महानगरच नव्हे तर राज्यात सर्वत्र उत्तम रस्ते असणे यावर प्राधान्य देण्यात आले असून ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी रस्ते खराब होऊ नयेत म्हणून ते काँक्रीटमध्ये बांधण्याचा निर्णय झाला आहे. एमएमआरडीए कडून लोकांच्या अपेक्षा वाढत असून महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्तांनी देखील नागरी सुविधा नागरिकांना व्यवस्थित मिळतील हे पाहणे गरजेचे आहे असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सर्व करतांना पर्यावरणाचा समतोल ढळू न देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

ताळमेळ व शिस्त हवी – आदित्य ठाकरे 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, केवळ शहरांतर्गत परिवहन आणि वाहतूक व्यवस्थेचा असा विचार न करता अगदी सूक्ष्म नियोजन करून वॉर्ड पातळीवर याचे नियोजन हवे. वाहतुकीच्या बाबतीत मिसिंग लिंक्स कुठल्या आहेत ते पाहिले पाहिजे. मुंबई, ठाणे या शहरांची भविष्यात वाढ आता अवघड असली तरी आता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गगनचुंबी अशी उभी आणि उंच वाढ सुरू झाली आहे. झोपडपट्टी पुनर्विकास, उपकरप्राप्त इमारतींची पुनर्रचना, म्हाडामार्फत गृहनिर्माण अशा वेगवेगळ्या संस्थांकडून शहरांमध्ये नवीन वसाहती निर्माण केल्या जात आहेत, साहजिकच लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्याला केवळ नवनवीन रस्त्यांचे नियोजन नव्हे तर उत्तम पर्यायी व जोड रस्ते यांचेही नियोजन करावे लागणार आहे. मुंबईत आज 3500 बसेस आहेत पण 10000 बसेस धावू लागतील तेव्हा वाढीव लोकसंख्येचा विचार करून आपण सर्वांना ही सुविधा देण्याचे समाधान मिळेल. याव्यतिरिक्त आपण इलेक्ट्रीक किंवा आणखी कोणते पर्यावरणपूरक इंधन वापरतोय हा देखील कळीचा मुद्दा आहे असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले की, ही सर्व व्यवस्था शाश्वत असली पाहिजे आणि यात चांगला ताळमेळ व शिस्त हवी तरच ती परिणामकारक ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *