सामान्य रुग्णालय भंडारा येथे सुरक्षा रक्षकांची अरेरावी? लोकशक्ती संघटनेचा आरोप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
Summary
भंडारा : सामान्य रुग्णालय भंडारा येथे कार्यरत असलेले काही सुरक्षा रक्षक रुग्णांच्या नातेवाईकांशी अरेरावीची वर्तणूक करत असल्याचा गंभीर आरोप लोकशक्ती भ्रष्टाचारविरोधी सामाजिक संघटनेने केला आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी आज दिनांक १७ रोजी सुमारे दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास रुग्णालय परिसरात फेरफटका मारला […]
भंडारा : सामान्य रुग्णालय भंडारा येथे कार्यरत असलेले काही सुरक्षा रक्षक रुग्णांच्या नातेवाईकांशी अरेरावीची वर्तणूक करत असल्याचा गंभीर आरोप लोकशक्ती भ्रष्टाचारविरोधी सामाजिक संघटनेने केला आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी आज दिनांक १७ रोजी सुमारे दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास रुग्णालय परिसरात फेरफटका मारला असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नयन शेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक आधीच मानसिक तणावात असतात. अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षकांकडून होणारी कथित उद्धट वागणूक ही नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे संबंधित गार्ड किंवा त्यांची नियुक्ती केलेल्या कंपनीवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी माननीय टेंभुर्णे साहेब यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी व योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा लोकशक्ती भ्रष्टाचारविरोधी सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हास्तरावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संभाव्य आंदोलनास विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा असल्याचेही शेंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या आरोपांबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
