सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू
मुंबई, दि. 25 : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण 125 व्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2020 आहे.
मत्स्यव्यवसाय व सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सहा महिन्याचे प्रशिक्षण शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. त्याअनुषंगाने 2020 -21 या चालू वर्षातील, 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या सहा महिन्याच्या कालावधीत सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन,सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे होणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा रुपये 450/- तर दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना दरमहा रुपये 100/- एवढे प्रशिक्षण शुल्क आहे. प्रशिक्षणासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत. १) प्रशिक्षणार्थी हा क्रियाशील मच्छिमार असावा व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. २) वयोमर्यादा 18ते 35 यादरम्यान असावी. ३) प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. ४) प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण आवश्यक आहे. ५) प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. ६) प्रशिक्षणार्थी हा बायोमेट्रिक कार्ड/आधार कार्ड धारक असावा. ७) विहित नमुन्यात परिपूर्ण अर्जासोबत संबंधित मत्स्यव्यवसाय संस्थेची शिफारस असावी. ८) प्रशिक्षणार्थी दारिद्ररेषेखालील असल्यास संबंधित सक्षम अधिकारी/ गट विकास अधिकारी यांचा दाखला अर्जासोबत असणे आवश्यक आहे.
वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक प्रशिक्षणार्थींनी विहित नमुना अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा मुंबई 61 या पत्त्यावर 16 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.