साखरपुड्याआधीच बदनामीचा कट – इंस्टाग्रामवरून तरुणीच्या आयुष्याशी घातलेला घात
तुमसर:- तालुक्यातील येरली गावात घडलेली ही घटना एखाद्या थरारक चित्रपटाची कथा वाटावी अशीच आहे. आयुष्याच्या नव्या पर्वाची तयारी सुरू असतानाच एका तरुणीच्या सन्मानावर घाला घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत, येरली गावाच्या उत्तरेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर ही घटना उघडकीस आली. 24 वर्षीय तरुणीच्या भावाला तिचा होणारा पती राकेश किशोर तोरणकर (वय 30, रा. बपेरा, ता. तुमसर) याने फोन करून एक धक्कादायक माहिती दिली.
राकेशच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट व्हॉट्सअॅप क्रमांकावरून त्याला अश्लील स्वरूपाचे मोर्फ केलेले व्हिडीओ आणि फोटो पाठवण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्या व्हिडीओंमध्ये फिर्यादी तरुणीचा चेहरा वापरून डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकृत स्वरूपात बदल करण्यात आला होता.
या प्रकारामागे “चंतजी-पा7350” नावाच्या इंस्टाग्राम आयडीचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. सदर आयडीधारकाने हेतुपुरस्सर तरुणीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकले असते.
या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे कायम गुन्हा क्रमांक 813/2025 नोंदविण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत तसेच नव्या डिजिटल गुन्हेगारी तरतुदींनुसार संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड करत असून, सायबर गुन्हेगारीचे धागेदोरे शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.
ही घटना केवळ एका तरुणीवर झालेला अन्याय नसून, डिजिटल युगात स्त्रीच्या प्रतिष्ठेला लक्ष्य करणाऱ्या विकृत मानसिकतेचे भयावह चित्र दाखवते. समाजाने आणि यंत्रणांनी अशा गुन्ह्यांविरुद्ध अधिक सजग होण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
