सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन नियोजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील नागरी, औद्योगिक क्षेत्रातील व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Summary
मुंबई, दि. २८ : सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत नागरी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आतापर्यंतच्या अनुभवांच्या आधारावर पुढे जाऊन दीर्घकालीन नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. राज्यातील नागरी तसेच औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापनाबाबत […]
मुंबई, दि. २८ : सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत नागरी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आतापर्यंतच्या अनुभवांच्या आधारावर पुढे जाऊन दीर्घकालीन नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. राज्यातील नागरी तसेच औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापनाबाबत आढावा मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, नागरी क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत प्राधान्यक्रम निश्चित करा. पाणी, जमीन आणि कचऱ्याच्या अनुषंगाने आता काय समस्या आहेत आणि येत्या काळात काय परिस्थिती उद्भवू शकते यांचा विचार करा. सांडपाणी प्रक्रियेतून मिळणाऱ्या शुद्ध पाण्याचा कसा वापर होणार, त्यासाठीच्या जलवाहिन्यांचे जाळे, अशा गोष्टींबाबतही नागरी भागासाठी नियोजन असावे लागेल. विदेशात मोठ्या उंच इमारतीमधील पाण्याच्या पुनर्वापराबाबत निश्चित धोरण आहे. अशा धोरणांचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल.
मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी काळात असेच कोरोना महामारीचे संकट राहिले किंवा अन्य आपत्कालिन स्थितीत उद्योगांकडे निश्चित असे पर्याय असावेत. त्यामध्ये विविध उपाययोजनांसह औद्योगिक क्षेत्रातच मनुष्यबळाच्या निवासाची व्यवस्था करता येईल अशा टाऊनशिपचा विचार व्हावा. जेणेकरून या उद्योगांतील उत्पादन थांबणार नाही. नागरी तसेच औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी आणि कचऱ्याबाबत आता जे प्रश्न आहेत, त्याबाबत गाठीशी असलेल्या अनुभवांचा विचार करून पुढे जावे लागेल. त्यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
औद्योगिक सांडपाणी आणि प्रदुषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग विभाग, एमआयडीसी आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांना एकत्रितरित्या रसायन निर्मिती उद्योगांबाबत धोरण निश्चित करावे लागेल. विशेषतः आता निवासी क्षेत्रालगत असलेले धोकादायक उद्योग आणि अशाप्रकारच्या उद्योगांसाठी भविष्यातील नियोजन या अनुषंगानेही सर्वंकष धोरण निश्चित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी बैठकीत श्री. पाठक यांनी राज्यातील नगरविकास विभागातर्फे सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापन यांच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम, स्पर्धा, प्रयोगांची माहिती दिली. तर श्री.अन्बलगन यांनी औद्योगिक सांडपाणी तसेच विविध उद्योग क्षेत्रांत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.