सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत एकसंध – जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई उपनगर, दि. ३१ : “सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध भारताचे स्वप्न बघितले होते आणि त्यांच्या कार्यामुळेच ते स्वप्न सत्यात उतरले. त्याचबरोबर भारतात प्रशासकीय सेवा सुरू करण्याचे श्रेयदेखील सरदार वल्लभभाई पटेल यांनाच जाते. त्यांचे हे कार्य देश नेहमीच लक्षात ठेवेल आणि त्यांच्या कार्यामुळे युवा पिढीला सातत्याने प्रेरणा मिळेल”, असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज व्यक्त केला.
नेहरू युवा केंद्राच्या मुंबई शाखेद्वारे आयोजित ‘एकता दौड’ कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मुंबईच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडेय, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर सुधीर पुराणिक, नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर कार्तिकीयन, मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या प्राध्यापिका वासंती कांदीवरन, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉक्टर प्रकाश कुमार वनन्जे, नेहरू युवा केंद्राच्या मुंबई शाखेचे उपसंचालक श्री.यशवंत मानखेडकर आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती चौधरी यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांनी ‘एकता शपथ’ घेऊन दौडीला प्रारंभ केला.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालय यांच्या अखत्यारितील नेहरू युवा केंद्राद्वारे देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘रन फॉर युनिटी’ अर्थात ‘एकता दौड’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.