BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

समाजातील भेदाभेद दूर करून एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म – मंत्री छगन भुजबळ

Summary

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत नामदेव यांसह अनेक संतांनी जात-पात व उच्च-नीच भेद नष्ट करून समतेचा संदेश दिला. संत साहित्याच्या माध्यमातून दया, क्षमा, करुणा आणि प्रेम यांचा प्रसार झाला. समाजातील भेदाभेद दूर करून […]

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत नामदेव यांसह अनेक संतांनी जात-पात व उच्च-नीच भेद नष्ट करून समतेचा संदेश दिला. संत साहित्याच्या माध्यमातून दया, क्षमा, करुणा आणि प्रेम यांचा प्रसार झाला. समाजातील भेदाभेद दूर करून एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री भुजबळ बोलत होते.

या कार्यक्रमाला मराठी भाषा, उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आमदार संतोष बांगर, माजी आमदार शहाजी पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज पाटील, हभप निवृत्ती महाराज रामदास, हभप नरहरी महाराज चौधरी, हभप रामदास महाराज तसेच राज्यभरातील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री सामंत यांनी सांगितले की, वारी ही जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक परंपरा आहे. वारकरी साहित्य संमेलनासाठी संपूर्ण मदत दिली आहे. ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा घराघरात पोहोचविण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. पैठण येथील संतपीठ व रामटेक संस्कृत विद्यापीठ सुरू केले आहे. यंदा पद्म पुरस्कारासाठी राज्यातील कीर्तनकारांची नावे पाठविण्यात आली आहेत.

मंत्री शिरसाट म्हणाले, वारकरी संप्रदाय समाजहितासाठी कार्यरत आहे. वारीसाठी सर्व दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये निधी देण्याचा येणार आहे. यापूर्वी प्रथम वर्षी बाराशे दुसऱ्या वर्षी चौदाशे दिंड्यांनी निधी दिला होता. वारकरी संप्रदाय सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहे. दिंड्यांना निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सन्मानाचे वारकरी संप्रदायाने आयोजन केले, याबद्दल आभारी आहे. शासन हे संत परंपरेच्या जतनासाठी प्रयत्नशील आहे. राज्य शासन वारकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहील.

कार्यक्रमात वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने मंत्री भुजबळ, मंत्री सामंत व मंत्री शिरसाट यांचा विठ्ठल मूर्तीची प्रतिकृती, स्मृतिचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *