नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगांसह वैद्यकीय ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

Summary

नाशिक 09 जुलै (जिमाका वृत्तसेवा) : संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता, तसेच डेल्टा प्लस, लॅम्बडा यासारखे कोरोनाचे नवे व्हेरीयंटचे संक्रमण लक्षात घेता कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांसह उद्योगधंदे सुरू राहण्यासाठी  ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक जिल्हा व […]

नाशिक 09 जुलै (जिमाका वृत्तसेवा) : संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता, तसेच डेल्टा प्लस, लॅम्बडा यासारखे कोरोनाचे नवे व्हेरीयंटचे संक्रमण लक्षात घेता कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांसह उद्योगधंदे सुरू राहण्यासाठी  ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक जिल्हा व शहरातील कोरोना सद्यस्थिती आणि कोरोना पश्चात आजारांबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री.भुजबळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात सुरू करण्यात आलेले उद्योग, कंपन्या संभाव्य तिसऱ्या लाटेत सुरू राहण्यासाठी त्यांना लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. त्याकरीता उद्योजकांनी कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था तेथील जवळच्या परिसरात करण्यात यावी अथवा त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करावी. यासर्व गोष्टींचे नियोजन उद्योजकांनी केले आहे किंवा कसे याबाबतची सविस्तर माहिती औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील बैठकीत सादर करावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी मंजुर करण्यात आलेले सर्व ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी या प्रकल्पांमध्ये भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत किंवा कमतरता राहणार नाही, यासाठी सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता करून घेवून त्यांच्या गुणवत्तेची पडताळणी करणे गरजेचे आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

मोठ्या स्वरूपातील उद्योग व संस्था हे सामाजिक दायित्व (सीएसआर) म्हणून निधी उपलब्ध करून देत असतात. हा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांच्या बैठका घेण्यात येवून, सीएसआरचा निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांना करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत.

शहरी भागातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येपेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढलेली आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामीणस्तरावर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या मदतीने नियोजन करण्यात यावे. याकरीता ग्रामीण भागात लग्न सोहळ्यांना परवानगी देते वेळी लग्न समारंभासाठी निर्धारीत केलेल्या उपस्थितांच्या संख्येचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच लग्नासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासणीसह त्यांना मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य करण्यात यावे. त्यानुसार ग्रामीण भागात गर्दी होणार यासाठी नियोजन करण्यात यावे, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.

लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यातून कोणीही गरजू वंचित राहणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

या बैठकीस महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच आरोग्य विभाग यांच्यामार्फत करण्यात आलेल्या कामांची व पुढील नियोजनाची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *