संत ज्ञानेश्वर उद्यान हे जागतिक दर्जाचे उद्यान बनणार- पालकमंत्री सदीपान भुमरे
औरंगाबाद, दि. 19 (जिमाका) : पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास कामांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून वाहनतळ, अंतर्गत रस्ते व अत्याधुनिक संगीत जलकारंजे यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. अनेक पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या उद्यानाला जागतिक दर्जाचे उद्यान बनविणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानच्या विकास कामांचा भुमिपुजन कार्यक्रम रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण,पाटबंधारे विभागाचे अधिक्षक सबनवार,अभियंता अशोक चव्हाण याची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. भुमरे म्हणाले संत ज्ञानेश्वर उद्यानाला जागतिक दर्जा कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. चाळीस वर्षापूर्वी उद्यान जसे होते तसेच करण्यात येईल. या ठिकाणी जागा भरपूर असल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना येथे निवास व्यवस्था देखील करण्यात येईल. उद्यानाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. येथे आलेला पर्यटक जास्त दिवस कसा राहिल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे जेणेकरुन रोजगारामध्ये वाढ होईल. संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विविध विकास कामे प्रत्यक्षात सुरू झाल्याने सध्या रस्ते,पार्किंग,पाईपलाईन, संगीतकारंजे,ई पहील्या टप्प्यात कामे होणार असुन दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कामे पूर्ण करून दिवाळी पुर्वी संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी नक्कीच खुले करण्यात येईल.सप्टेंबर मध्ये शहरात जागतिक पर्यटन परिषद होणार आहे. या परिषदेतील शिष्टमंडळांना धरण, उद्यान दाखविण्यात येईल असेही ते म्हणाले.