संतुलित आहार आरोग्यासाठी अधिक उपयुक्त – अन्वेषा पात्रा
Summary
मुंबई, दि. ८ : रोजच्या जेवणात विविध पोषणमूल्यांचा समावेश असलेला आहार शरीराला ऊर्जा तर पुरवतोच, पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतो. सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे, असे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अन्वेषा पात्रा यांनी सांगितले. टेक-वारी कार्यक्रमांतर्गत मंत्रालयात ‘डब्यासाठीच्या आरोग्यदायी […]

मुंबई, दि. ८ : रोजच्या जेवणात विविध पोषणमूल्यांचा समावेश असलेला आहार शरीराला ऊर्जा तर पुरवतोच, पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतो. सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे, असे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अन्वेषा पात्रा यांनी सांगितले.
टेक-वारी कार्यक्रमांतर्गत मंत्रालयात ‘डब्यासाठीच्या आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती’ या विषयावर अन्वेषा पात्रा यांचे व्याख्यान झाले.
अन्वेषा पात्रा म्हणाल्या, दिवसभराच्या कामकाजात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठी ऑफिसच्या डब्याला विशेष महत्त्व आहे. फास्ट फूड तसेच पॅकेज्ड पदार्थांऐवजी घरचा पौष्टिक व संतुलित आहार असलेला डबा आरोग्यासाठी अधिक उपयुक्त ठरतो. मुलांच्या, आपल्या स्वतःच्या डब्यात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्व, आणि कर्बोदके असणे आवश्यक आहे. डब्यात भाजी, डाळ, भात किंवा पोळी, फळ असावेत. फास्ट फूड, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळून डब्यात सकस आणि सहज पचणारे पदार्थ समाविष्ट करावेत. यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते, थकवा कमी होतो आणि कामात लक्ष केंद्रित करता येते.
आजकाल अनेक पालक मुलांच्या डब्याचा आरोग्याच्यादृष्टीने विचार करून नियोजन करू लागले आहेत. ऑफिससाठी आठवड्याभराच्या डब्यातील आहाराचेही नियोजन करून वेळेचे व्यवस्थापन करता येते. पदार्थ दिसायला आकर्षक आणि चवदार असावा, पण त्यासोबत तो पोषणमूल्यांनी भरलेला असणे आवश्यक आहे, असेही अन्वेषा पात्रा यांनी सांगितले. शेफ अंकित पिल्ले यांनी डब्यासाठीच्या रेसिपींचे प्रात्यक्षिकही यावेळी करुन दाखवले.
0000