संतपीठात चालू शैक्षणिक सत्रात अभ्यासक्रम सुरू करावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
Summary
औरंगाबाद, दि. 30 (जिमाका) : पैठण येथील संतपीठात चालू शैक्षणिक सत्रात अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तत्परतेने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पैठण येथील संतपीठातील अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतच्या […]
औरंगाबाद, दि. 30 (जिमाका) : पैठण येथील संतपीठात चालू शैक्षणिक सत्रात अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तत्परतेने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पैठण येथील संतपीठातील अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. सामंत यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, यांच्यासह संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
मंत्री श्री. सामंत यांनी पैठण येथील संतपीठाची प्रशासकीय इमारत, वसतिगृहाच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेऊन या ठिकाणी अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असून चालू शैक्षणिक वर्षात संतपीठात अभ्यासक्रम सुरू करावयाचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कुलगुरू येवले यांनी शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी मागणी केलेल्या पन्नास लाख रुपयांचा निधी शिक्षण विभागाकडून देण्यात येईल. त्याचा प्रस्ताव उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे तातडीने सादर करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथील वसतिगृहाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून संतपीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या फर्निचरचे काम तातडीने सुरू करावे. त्यासाठीची आवश्यक सुरक्षा व्यवस्था विद्यापीठाने उपलब्ध करून देण्याचे निर्देशित करून श्री. सामंत यांनी संतपीठाच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने विद्यापीठाने तयार केलेल्या तेवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने या प्रस्तावावर अर्थमंत्री यांच्या सोबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.
कुलगुरू येवले यांनी जिल्हा नियोजन निधीतून देण्यात आलेल्या 1 कोटी निधीतून संतपीठाची प्रशासकीय इमारत, वसतीगृहाचे काम पूर्ण झालेले असून याठिकाणी निवासी आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुविधा देण्याचे नियोजन असल्याचे सांगून संतपीठाच्या पुढील वाटचालीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या 23 कोटी रकमेच्या प्रस्तावाबाबत माहिती दिली.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरचे लोकार्पण यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्याला दहा व्हेंटिलेटर देण्यात आले. यावेळी आमदार अंबादास दानवे यांच्यासह संबंधित उपस्थित होते.