शेतकऱ्यांसाठी खेळणातील गाळ विनाशुल्क उपलब्ध सोबत गाळ भरून देण्यासाठी पोकलेन यंत्राची मोफत सुविधा संधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे युवानेते अब्दुल समीर यांचे अवाहन
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.6, शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेला खेळणा मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने पाटबंधारे विभागाच्या वतीने पोकलेन यंत्राची सुविधा देण्यात आली आहे. सुपीक शेती करण्यासाठी फायदेशीर ठरणारा हा गाळ शेतकऱ्यांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आला असून या संधीचा फायदा घेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जावा असे अवाहन युवानेते अब्दुल समीर यांनी केले आहे.
शनिवार ( दि.5 ) रोजी पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचा शुभारंभ युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी श्री. समीर यांनी वरील अवाहन केले.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, नगरसेवक प्रशांत क्षीरसागर, राजू गौर,सौ. वर्षा पारखे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता रोशन महाजन आदींसह परिसरातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना अब्दुल समीर म्हणाले की, खेळणा मध्यम प्रकल्पातून सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा होतो. या धरणातील गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी अधिक पाणी उपलब्ध होऊ शकेल. शनिवार रोजी एक पोकलेन यंत्रांद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने या कामासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्र सामग्री पुरविण्याची तयारी पाटबंधारे विभागाने दर्शविली आहे. शेतकऱ्यांकडून गाळाची मागणी वाढल्यास यंत्रसामुग्री वाढविण्यात येईल असे अब्दुल समीर यांनी सांगितले.
———————————————–
कित्येक वर्षापासून तलावात पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेला गाळ हा इतर सर्व खतांपेक्षाही जास्त उपयुक्त असून शेतात गाळ टाकल्यानंतर शेतातील सुपीकता वाढण्यास मदत होते. तसेच उत्पादनही वाढते. असे कृषी तज्ञांचे मत आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. किमान गाळ काढण्यासाठी शासनाकडून सुविधा मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाटबंधारे विभागाच्या वतीने पोकलेन यंत्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनी केले.
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड