शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्याच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
Summary
नाशिक दि. 1 जुलै (जिमाका वृत्तसेवा) : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले, त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देऊन शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचाच वारसा घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा […]
नाशिक दि. 1 जुलै (जिमाका वृत्तसेवा) : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले, त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देऊन शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचाच वारसा घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा व त्यांची फसवणूक होणार नाही यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी असून त्यांना न्याय देण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
आज देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार सरोज अहिरे, दिलीप काका बनकर, नितीन पवार, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, सय्यद पिंपरी गावचे सरपंच मधुकर ढिकले यांच्यासह उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल ढिकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास जलद गतीने विकास होण्यास मदत होईल. याकरिता सर्वांनी जातीने लक्ष दिल्यास कामाची गुणवत्ता टीकून राहण्यास मदत होईल. आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या जिद्द व चिकाटीने आपल्या विधानसभा मतदारसंघात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन देवळाली विधानसभा मतदारसंघ येथील प्रस्तावित असलेल्या 15 कोटींच्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी 5 कोटी निधी त्वरीत उपलब्ध करून देण्यात येणार असून, क्रीडा संकुलाचे काम सुरु झाल्यानंतर उर्वरीत निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
आरोग्य विभागात कोरोना काळात निधीची कमतरता पडू नये यासाठी अधिवेशनात 300 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून अन्न व नागरी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग या विभागांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. त्याचप्रमाणे देशात सर्वात जास्त लसीकरण राज्यात झाले आहे. यापुढेही जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी हाफकीन या संस्थेला लस निर्मितीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी कोरोना काळात रुग्णांची अथक सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी व डॉक्टरांना डॉक्टर दिना निमित्त शुभेच्छा देऊन, सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व तिसऱ्या लाटेत स्वत:सोबत आपल्या कुटुंबाची व बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले आहे.
जगभरात शेतमालाची निर्यात करणारा भारत महत्त्वपूर्ण देश : छगन भुजबळ
स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी खेड्यापाड्यात जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देऊन कृषि क्रांती घडविली आहे. त्यामुळे आज आपला देश जगभरात शेतमालाची निर्यात करणारा महत्त्वपूर्ण देश बनला आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा वारसा पुढे सुरु ठेवून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी भरीव योगदान देणे महत्त्वाचे आहे. तसेच जिल्ह्यात अतिशय सुंदर क्रीडा संकुल उभे राहत असून यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
या विकास कामांचा झाला शुभारंभ
देवळाली विधानसभा मतदारसंध येथील विविध विकास कामांसाठी 51 कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये कसबे सुकने सैय्यद पिंप्री आडगांव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 4 कोटी रुपये, सैय्यद पिंप्री येथील वाल्मिकी नगर रास्ता तयार करण्यासाठी 57 लाख रुपये, सैय्यद पिंप्री ते किसान नगर रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 24 लाख रुपये, आनंदवली चांदशी मुंगसारे दरी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 10 कोटी रुपये, मुंगसारे येथील रामशेज रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 65 लाख रुपये, दरी ते चारोस्कर रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 41 लाख रुपये, माडसांगवी येथील गोडसे वस्ती रस्त्यासाठी 72 लाख रुपये, राहूरी ते करंजकर वस्ती रस्त्यासाठी 1 कोटी रुपये, विंचूर गवळी ते माडसांगवी रस्त्यासाठी 1 कोटी 66 लाख रुपये, नाशिक रोड विभाग प्रभाग क्रमांक 22 मधील विहितगाव गावठाण अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणासाठी 50 लाख रुपये व पिंपळगाव खांब जाधव वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण व पावसाळी गटार करण्यासाठी 50 लाख रुपये, नाशिक रोड विभाग प्रभाग क्रमांक 19 मधील सामनगाव रोड ते चाडेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्यासाठी 2 कोटी रुपये, प्रभाग क्रमांक 27 चुंचाळे जलकुंभ ते घरकुल रोड रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरणासाठी 1 कोटी 50 लाख रुपये व मारुती संकुल व कारगिल चौक परिसरातील रस्ते अस्तरीकरणासाठी 1 कोटी रुपये, प्रभाग क्रमांक 31 मधील दाढेगाव भोरवस्ती रस्त्यांचे व पिंपळगाव खांब येथील चिंचवाडी व कारवाडी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी 1 कोटी 50 लाख रुपये, व पाथर्डी सर्वे नंबर 307 येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी 1 कोटी 50 लाख रुपये, भगूर, नाणेगाव, पळसे रस्ता सुधारण्यासाठी 5 कोटी रुपये, दहेगांव जातेगाव, महिरावणी, ओझरखेड, गिरणारे रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रुपये, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी 2 कोटी रुपये, मौजे बेलतगव्हाण येथील भाक्षी नाल्यावर मोरी टाकण्यासाठी 25 लाख रुपये अशा 51 कोटी निधी कामे करण्यात येणार आहे.