शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व्याहाड ते मोवाड यात्रा सुरु

नागपूर, प्रतिनीधी
भाजपा प्रणित सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. शेतकऱ्यांचे पुर्णपणे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे सामान्य जनता परेशान झाली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने व्याहाड ते मोवाड “लढा माझ्या शेतकऱ्याचा” यात्रा राष्टवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांचे नेतृत्वात शुक्रवार पासुन व्याहाड येथुन सुरु झाली.
देशातुन मोठया प्रमाणात कापसाचे आयात होत असल्याने कापसाला भाव मिळत नाही. सध्या संत्रा व मोसंबीला मातीमोल भाव मिळत आहे. बांग्लादेशला संत्रा पाठविण्यासाठी अगोदर १८ रुपये कर लागत होता. आता तोच कर १०८ रुपये झाला आहे. यामुळे संत्रा व मोसंबीची निर्यात होत नसल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. सोयाबीन तेल व सोयापेंड मोठया प्रमाणात आयात करण्यात येत असल्याने सोयाबीनला भाव मिळत नाही. नुकसान होवूनही शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. पिक विमा कंपनीकडुन जाचक अटी लावुन मदत देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येते. दुसरीकडे खते, फवारणीचे औषध, शेतकी अवजारे यांच्यावर मोठया प्रमाणात जि.एस.टी. लावल्याने त्याचे भाव वाढले आहे. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. बाजारात आज जो शेतमालास भाव मिळत आहे त्यातुन साधा उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. खाण्याच्या तेला पासुन ते मिठापर्यत सर्वच वस्तुंच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. हे सर्व विषय घेवून अनिल देशमुख व सलील देशमुख यांनी हि यात्रा काढली आहे.
यात्रेचा हा पहिला टप्पा व्याहाड ते मोवाड असून ६ दिवसात ७० गावात ही यात्रा जाणार आहे. सकाळी ८ वाजतापासुन यात्रेला सुरुवात होईल व रात्री ८ वाजता त्या दिवशीची यात्र संपेल. पहील्या दिवशी ही यात्रा व्याहाड येथुन सुरु होवून पेठ, धामणा, सातनवरी, बाजारगाव, शिवा, दुधाळा, कचारी सावंगा, रिधोरा करीत लिंगा येथे मुक्काम स्थळी पोहचली. या यात्रेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि सामान्य नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते. शनिवारला ही यात्रा काटोल पासुन सुरु होवून डोंगरगाव, येनवा, गोन्ही, चिखली, मेंडकी, सोनोली मार्गाने जावून सावरगाव येथे मुक्कामी राहणार आहे.