शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा
Summary
भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून लढा देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींना आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला आळा घालण्यासाठी धडक मोर्चा हा लढाऊ आंदोलनाचा स्वरूप घेऊन १३ ऑगस्ट २०२५रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे ऐतिहासिक […]
भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून लढा देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींना आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला आळा घालण्यासाठी धडक मोर्चा हा लढाऊ आंदोलनाचा स्वरूप घेऊन १३ ऑगस्ट २०२५रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे ऐतिहासिक मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा मंडळ यात्रा शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी खास आयोजित केला असून त्यामागचा उद्देश आहे – शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचे सातबारा कोरे करणे.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष चरणभाऊ सोविदा वाघमारे करणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रेरणेतून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा उभा राहणार आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, शेतकरी आणि सर्वसामान्य जनता एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आवाज बुलंद करणार आहे.
मोर्च्याचे मुख्य मागण्या:
१) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.
२)कर्जमाफीची प्रक्रिया तात्काळ राबवून सातबारा कोरे करावेत.
३) शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आर्थिक धोरणे शेतकरी-हितकारी करण्यात यावीत.
गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन खर्च वाढत असताना, विक्री दरात अपेक्षित वाढ होत नाही. यामुळे शेतकरी कर्जाच्या जोखडाखाली दबले गेले आहेत. याशिवाय नैसर्गिक आपत्ती, बाजारातील चढउतार आणि अपुऱ्या शासकीय योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धडक मोर्चा हा केवळ आंदोलन नसून, शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न बनला आहे.
मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असून, जिल्ह्यातील शेकडो गावांमधून शेतकरी मोठ्या संख्येने भंडाऱ्याकडे रवाना होतील. आंदोलनाचे स्वरूप शांततापूर्ण असेल, मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा आणि त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरचा हा धडक मोर्चा निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. जनतेच्या आवाजाला प्रतिसाद देण्यासाठी प्रशासनाने योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा.
संकलन
गणेश सोनपिंपळे
न्यूज रिपोर्टर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
