BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘शासन दिव्यांगांच्या दारी’! ; प्रत्येक जिल्ह्यात शिबिराचे आयोजन होणार एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळणार

Summary

मुंबई दि. १५ : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास […]

मुंबई दि. १५ : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य सचिव असतील.

शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान सुरु केले असून आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आहेत.

दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे, त्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी शासनाने “दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास २९ लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात एकूण २९ लाख ६३ हजार ३९२  दिव्यांगांची संख्या असून त्यापैकी केवळ ९ लाख दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र प्राप्त झाले आहे, उर्वरित दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र नसल्याने अनेक योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या शिबिरात वैश्विक ओळखपत्र देण्याच्या कार्यक्रमाला गती मिळणार आहे.

त्याचबरोबर शेत जमिनी संबंधित कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी देखील या एक दिवसीय शिबिराची मदत मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनातून तसेच सामाजिक संस्था यांच्या सीएसआर मधून उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारी विविध उपकरणे देखील वाटप करण्यात येणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून त्यांची मुख्य मार्गदर्शक म्हणून या अभियानाकरिता नियुक्ती केलेली आहे. या अभियानाची सुरुवात दि. ७ जून रोजी मुंबई येथून करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यात देखील मुख्य मार्गदर्शक यांच्या सूचनाप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

मुंबईत एकाच दिवशी साडेतीन हजार दिव्यांगांना लाभ

‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी’ उपक्रमाची मुंबई येथुन सुरूवात झाली आहे.

दि. ७ जून  रोजी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ३५०० दिव्यांग व्यक्तींनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. एकूण ६० विभागांचे स्टॅाल या उपक्रमामध्ये सहभागी होते, विविध ९० शासकीय सुविधांची/ योजनांची माहीती व अर्ज या स्टॅालवर उपलब्ध होते, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन यांनी दिली.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *