शासन आपल्या दारी : शामराव पेजे महामंडळाच्या योजनांचा घ्या लाभ
शासकीय योजनांची माहिती देणे, त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे तसेच या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासन आता थेट नागरिकांच्या दारी जाणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठीच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शामराव पेजे कोकण तर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे.
राज्यात सुशिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आहे. व्यक्ति, कुटुंब व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने महामंडळाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीपर्यंत राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेऊन सक्षम होता येईल. महामंडळाच्या योजना खालील प्रमाणे.
२०% बीज भांडवल योजना :-
ही योजना राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येते. महामंडळाचा सहभाग २०% असून लाभार्थीचा सहभाग ५% व बँकांचा सहभाग ७५% असतो. या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु. ५.०० लाख आहे. महामंडळाच्या कर्जावरील व्याजाचा दर ६% असून परतफेडीचा कालावधी ५ वर्ष इतका आहे. अर्जदाराचे १८ ते ५० वर्षे असावे. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. १.०० पर्यंत.
रु. १.०० लाखापर्यंतची थेट कर्ज योजना :-
अर्जदाराचे वय १८ ते ५५ असावे. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान ५०० इतका असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता रु. १.०० लाख असावे. लाभार्थींचा सहभाग निरंक राहील. नियमित ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल २,०८५/- परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित झालेल्या हत्यांवर द.सा.द.शे. ४% व्याजदर आकारण्यात येईल.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रु. १०.०० लाख पर्यंतची कर्ज योजना :-
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र, इ. व्यवसायाकरीता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करुन देणे हा उद्देश आहे.
महामंडळाच्या पोर्टलवर नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य. बँकेमार्फत लाभार्थींना रुपये १०.०० लाखापर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असावे. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ८.०० लक्ष पर्यंत.
या योजनांच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत येथे अथवा 8879945080 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.