BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

शासनाचे सर्व विभाग एकाच छताखाली आणून शिबिरे घेतल्यास जनतेचा वेळ, पैसा व श्रम वाचतात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्व नागपूर येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे आयोजन

Summary

सर्वसामान्यांच्या ‘ईझ ऑफ लिव्हिंग’साठी प्रयत्नशील नागपूर, दि. 11 : सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. शासनाचे सर्वच विभाग एका छताखाली आणून शिबिरे घेतल्यास लोकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचून दिलासा मिळतो. एखाद्या लाभार्थ्याला अनेक योजनांचा लाभ एकाच […]

सर्वसामान्यांच्या ‘ईझ ऑफ लिव्हिंग’साठी प्रयत्नशील

नागपूर, दि. 11 : सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. शासनाचे सर्वच विभाग एका छताखाली आणून शिबिरे घेतल्यास लोकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचून दिलासा मिळतो. एखाद्या लाभार्थ्याला अनेक योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्यास फायदेशीर ठरते. सर्वसामान्यांच्या ‘ईझ ऑफ लिव्हिंग’साठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रात आज शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, मोहन मते, टेकचंद सावकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, स्थानिक नगरसेवक यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या अंमलबजावणीचा उल्लेख करीत उपमुख्यमंत्री म्हणाले की, सुमारे आठ लाख लाभार्थ्यांना या योजनेतून आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात लाभ मिळाला आहे. 25 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाल्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. केंद्रात व राज्यात सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व स्तरातील नागरिकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात वयोश्री योजनेचे शिबिर घेण्यात आले. सर्वच प्रकारचे लाभ ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून मोफत देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

केंद्राबरोबरच राज्य शासनाच्याही अनेक योजना आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजना ही त्यापैकी एक योजना आहे. यापूर्वी ही योजना काही रेशनकार्डधारकांपुरतीच मर्यादित होती. आता सर्वांना ही योजना लागू झाली आहे. पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहेत. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये अद्ययावत करीत आहोत. याचाच एक भाग म्हणून नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 500 तर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयासाठी 400 कोटींचा निधी देण्यात आला आहे. खाजगी दर्जाची शासकीय रुग्णालये राहणार असून सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहेत. पूर्व नागपुरात अनेक विकासकामे सुरू असून या विकासकामांबरोबरच पट्टेवाटपाच्या कामांना अधिक गती देण्याची सुचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी नारायणसिंग ठाकूर, माया वानखेडे, मानवी गावंडे, पूर्णिमा बरडे आणि कांचन मोहरकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. विवाह नोंदणी, आधार कार्ड अद्ययावत करणे, ज्येष्ठ नागरिक कार्ड, राशन कार्ड, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र असे विविध विभागांचे 34 स्टॅाल कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते.

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आपल्या प्रास्ताविकात शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सूर्यवंशी यांनी केले तर संजय अवचट यांनी आभार मानले.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *