महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

शासकीय सेवाकाळात कामाचा ठसा उमटवणे महत्त्वाचे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Summary

मुंबई, दि. २ : शासकीय सेवेत आल्यानंतर विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता, कामाचा प्राधान्यक्रम आणि सकारात्मकता शासकीय सेवा काळात अत्यंत महत्त्वाची असते. हे गुण अंगी बाळगून आपल्या सेवाकाळात कामाचा ठसा उमटविणे महत्वाचे असते, असे मत मुख्य सचिव राजेश अग्रवाल […]

मुंबई, दि. २ : शासकीय सेवेत आल्यानंतर विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता, कामाचा प्राधान्यक्रम आणि सकारात्मकता शासकीय सेवा काळात अत्यंत महत्त्वाची असते. हे गुण अंगी बाळगून आपल्या सेवाकाळात कामाचा ठसा उमटविणे महत्वाचे असते, असे मत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.

मंत्रालयातील परिषद सभागृहात गृह विभागाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव तथा मुंबई पोलीस हाउसिंग टाउनशिपचे अध्यक्ष इक्बाल सिंग चहल उपस्थित होते.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी श्री. चहल यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्यासोबतच्या विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच मसुरी प्रशिक्षण केंद्रातील अनुभव, कोविड साथीच्या काळात मुंबई महापालिका आयुक्त म्हणून केंद्र सरकारच्या पातळीवर दिल्ली येथे झालेल्या त्यांच्या कार्याचा गौरव याचाही उल्लेख केला.

अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर  म्हणाल्या, श्री. चहल यांनी ज्या विभागात काम केले त्या विभागात आपल्या कामातून विभागाची प्रतिमा उंचाविण्याचे कार्य केले. जलसंपदा विभागातील कामाचा विशेष उल्लेख करीत विभागांतर्गत सुरू असलेले सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यात श्री. चहल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले.

यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनीही अनुभव कथन केले. गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग आणि राधिका रस्तोगी यांनीही आपल्या मनोगतात श्री. चहल यांच्या कामाची वैशिष्टे विषद केली.  यावेळी सहसचिव सुग्रीव धपाटे, व्यंकटेश भट, उपसचिव अरविंद शेटे यांनीही सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव चहल यांच्या कार्याचा गौरव केला.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कक्ष अधिकारी मीनाक्षी कराळे यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, गृह विभागाचे सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *