कोल्हापुर महाराष्ट्र हेडलाइन

शासकीय अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन चांगल्या प्रकारे काम करावे – कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी घेतला विविध विभागांच्या कामांचा आढावा

Summary

◆ शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्याच्या दृष्टीने शेतीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा ◆ शेतकऱ्यांना विमा योजनांचा लाभ वेळेत मिळवून द्या ◆ निवासी शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी जलदगतीने प्रयत्न करणार ◆ ‘शिवभोजन’ योजनेतील थाळीचा दर्जा चांगला ठेवा ◆ ‘कोल्हापूर ही सहकाराची पंढरी’.. सहकार विभागाची स्वतंत्र बैठक कोल्हापूर, […]

◆ शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्याच्या दृष्टीने शेतीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा

◆ शेतकऱ्यांना विमा योजनांचा लाभ वेळेत मिळवून द्या

◆ निवासी शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी जलदगतीने प्रयत्न करणार

◆ ‘शिवभोजन’ योजनेतील थाळीचा दर्जा चांगला ठेवा

◆ ‘कोल्हापूर ही सहकाराची पंढरी’.. सहकार विभागाची स्वतंत्र बैठक

कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमध्ये प्रशासकीय यंत्रणेने लोकांना दिलासा देऊन उत्तम प्रकारे सेवा बजावली आहे, यापुढेही शासकीय अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन चांगल्या प्रकारे काम करावे, अशा सूचना कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी केल्या.

कोल्हापूर मधील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्र. जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी कृषी, सहकार, समाजकल्याण, अन्न व नागरी पुरवठा आदी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना वेळेत शासनाची मदत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. अतिवृष्टी व पुरामुळे शेडनेट, ठिबक सिंचन योजनांबरोबरच जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करावेत. पिक विमा योजनांच्या प्रतिनिधींची शेतकऱ्यांप्रति सहकार्याची भूमिका असल्याची खात्री कृषी विभागाने करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघातविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना ‘बांधावर खते बी-बियाणे’ पुरवण्यासाठी राज्य शासनाचा भर असून यादृष्टीने कृषी विभागाने योग्य नियोजन करावे. पूरबाधित भागांमध्ये जलद गतीने वीज पुरवठा सुरु करून महावितरण विभागाने चांगले काम केले असून शेती क्षेत्रातील वीजपुरवठाही तात्काळ सुरळीत होण्यासाठी गतीने कार्यवाही करावी.

राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थी व लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना करुन समाजकल्याण विभागांतर्गत निवासी शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांची पदे भरण्यासाठी जलद गतीने प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. पुरामुळे विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले खराब झाले असल्यास त्यांचे नुकसान होणार नाही, यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी.

सहकार क्षेत्राचा आढावा घेताना ते म्हणाले, ‘कोल्हापूर ही सहकाराची पंढरी’ आहे. सहकार विभागाच्या अडीअडचणी व या विभागाच्या कामांबाबत सविस्तर बैठक घेण्यात येईल. जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण सहकारी संस्थांना बळकटी देण्याबाबतही विचार कर, असे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या वतीने गरीब व गरजू व्यक्तींसाठी स्वस्त दरात ‘शिवभोजन योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जा चांगला असल्याची खात्री करावी, अशा सूचना त्यांनी आवर्जून देवून धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा तात्काळ बसवून घ्यावी, असे आदेश राज्यमंत्री डॉ.कदम यांनी दिले.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, पूरपरिस्थिती मध्ये जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, सहकारी संस्थांचेही नुकसान झाले आहे. शेडनेट, ठिबक सिंचन योजनांचेही नुकसान झाले आहे. यासाठी देखील शासनाच्या वतीने मदत होणे आवश्यक आहे.  नदीकाठी विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठा होत नाही. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. यासाठी शेती क्षेत्रातील वीज पुरवठा लवकरात लवकर सुरु होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणातून आपापल्या विभागाची सद्यस्थिती, रिक्त पदे, उपलब्ध मनुष्यबळ व झालेल्या कामांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *