शहरातील आरओचे पाणी आरोग्यासाठी योग्य आहे का? आरओ प्लांट व्यवसायाला तीन विभागांची परवानगी आवश्यक
भंडारा जिल्ह्यात सुमारे ४०० च्यावर आरओ प्लांट आहेत. पण हे सर्वच व्यवसाय आवश्यक परवानगी न घेताच सुरू असल्याचे दिसत आहे. आरओ प्लांट व्यवसायासाठी केंद्रीय भुजल मंडळ, अन्न व औषध प्रशासन तसेच आरोग्य विभागाचे नाहकत प्रमाणपत्र आवश्यक असून त्यानंतरच त्यांना रितसर परवानगी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील काही आरओ प्लांट अनाधिकृतपणे सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच पाणी शुध्द करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीनरीसुध्दा आयएसआय मानांकीत नसल्याचे दिसते., असे असतानाही जिल्ह्यात नेमके किती आरओ प्लांट व्यवसाय सुरु आहेत याची माहितीच भूजल सर्वेक्षण विभागाकडे आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या आरओ प्लांट व्यावसायिकांना त्यांच्या पाण्याच्या स्त्रोताची भूजल सर्वेक्षण विभागाकडून तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. पण मागील पाच वर्षांत एकाही आरओ प्लांट व्यावयायिकाने त्यांच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाण्याचे नमुने घेवून त्याची तपासणीच केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
परवानगी २०० फुटांची तर जमीन पोखरली ४०० फूट
शहरासह जिल्ह्यातील अनेक आरओ प्लांट व्यावसायिकांनी त्यांच्या प्लांटच्या आवारात बोअरवेल करताना शासकीय नियमांना बगलच दिली आहे. कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेला पिण्याच्या पाण्याच्या वापराकरिता केवळ २०० फुटापर्यंतच बोअरवेल करण्याची परवानगी दिली जाते. पण जिल्ह्यातील अनेक आरओ प्लांट व्यावसायिकांनी ३५० फुटापेक्षाही जास्त खोल बोअरवेल केल्याचे वास्तव आहे.
आरओ प्लांट व्यवसायाला तीन विभागांची परवानगी आवश्यक
जिल्ह्यातील एकाही व्यावसायिकाने अद्याप केली नाही पाण्याची तपासणी
जिल्ह्यात किती आरओ प्लांट अधिकृत व रितसर सुरु आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार पाणी पिण्यास योग्य असल्याचा दाखला आहे का?
शहरासह जिल्ह्यात उभारण्यात आलेले आरओ प्लांटमधील पाणी शुध्द करण्यासाठी वापरण्यात आलेले मशिनरी यंत्र ही आयएसआय मानांकित आहेत का? वापरण्यात आलेली मशिनरीद्वारे पाणी खरच शुध्द होत आहे की शुध्द पाण्याच्या नावावर नुसत थंड पाणी ग्राहकांना देवून त्यांची फसवणुक केली जात आहे. आरओ प्लांटमधील उभारण्यात आलेल्या मशिनरीची तपासणी करण्यात यावी, जेणेकरुन नागरिकांच्या आरोग्यास धोका होणार नाही. तसेच राज्य सार्वजनिक आरोग्यशाळेकडून पाण्याची तपासणी केली जात आहे का? क्षेत्रीय कार्यालयाच्या अरोग्य निरीक्षकांद्वारे वेळोवेळी पाण्याचे नमुणे घेवुन तपासणी होते का?
जलस्त्रोत तपासणीचा आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
जिल्ह्यातील सर्वच आरओ प्लांट व्यावसायिकांच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या खोलीची तपासणी होणे गरजेचे आहे. ही तपासणी करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभाग तयार असला तरी त्याला जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या लेखी सूचनांची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश दिल्यावर भूजल सर्वेक्षण विभाग जिल्ह्यातील सर्वच आरओ प्लांट व्यावसायिकांच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या खोलीची तपासणी करणार आहे.
