शंकर मंदिराची तोडफोड; अज्ञाताकडून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार, अड्याळ पोलिसांत गुन्हा दाखल
Summary
भंडारा | प्रतिनिधी भावड गावाच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भावड–कोंढा मार्गावरील नाल्यालगत असलेल्या शंकर मंदिरातील शिवलिंगाची अज्ञात इसमाने तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. […]
भंडारा | प्रतिनिधी
भावड गावाच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भावड–कोंढा मार्गावरील नाल्यालगत असलेल्या शंकर मंदिरातील शिवलिंगाची अज्ञात इसमाने तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी रात्री 10 वाजेपासून ते 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश करून शंकरजीच्या मूर्तीचे हात व डोके तोडून नुकसान केले. सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच गावात खळबळ उडाली.
या घटनेप्रकरणी पद्माकर आनंदराव वाढई (वय 39, रा. भावड, ता. पवनी, जि. भंडारा) यांनी अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे अड्याळ पोलीस ठाण्यात अप.क्र. 17/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 298 (धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी परिसरात दक्षता वाढवली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्या अशा कृत्यांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने, या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
