व्हॉट्सॲपवर ‘बाबा’चा सापळा; पूजापाठाच्या नावाखाली 4.35 लाखांची फसवणूक नातेसंबंध सुधारण्याचे आमिष, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
भंडारा | प्रतिनिधी
“तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत… नातेसंबंध बिघडले आहेत… पूजा-पाठ केला तर सगळं ठीक होईल…”
अशा गोड शब्दांच्या जाळ्यात अडकवत एका अज्ञात इसमाने महिलेला लाखो रुपयांचा आर्थिक फटका दिल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
दिनांक 5 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांक 9649634909 व 9549230045 वापरणाऱ्या इसमाने स्वतःचे नाव बसीम अली खान (बाबा) असल्याचे सांगून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी आणि मित्रासोबतच्या नातेसंबंधांवर तोडगा काढण्यासाठी पूजा-पाठ व धार्मिक विधी करण्याचे आमिष दाखवण्यात आले.
टप्प्याटप्प्याने पैशांची उकळणी
या तथाकथित ‘बाबा’ने विश्वास संपादन करत विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण 4 लाख 35 हजार 200 रुपये जमा करण्यास फिर्यादी महिलेला प्रवृत्त केले. पूजा पूर्ण झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून पोलीस स्टेशन सायबर, भंडारा येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध
अपराध क्रमांक 01/2025
कलम 318(4) भा.न्या.संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(ब) व 66(क) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णकुमार तिवारी करीत असून, संबंधित मोबाईल क्रमांक, बँक खाती व डिजिटल व्यवहारांचा सखोल तपास केला जात आहे.
सावधान! अंधश्रद्धा ठरतेय फसवणुकीचे हत्यार
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की—
सोशल मीडियावर ओळख नसलेल्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये
पूजा-पाठ, तंत्र-मंत्र, नातेसंबंध सुधारणा अशा आमिषांना बळी पडू नये
कोणत्याही कारणासाठी ऑनलाईन पैसे पाठवण्यापूर्वी खातरजमा करावी
एक क्षणाचा विश्वास आणि भावनिक कमकुवतपणा कसा मोठ्या आर्थिक फसवणुकीत बदलू शकतो, याचे हे प्रकरण ठळक उदाहरण ठरत आहे.
संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
