व्हर्च्युअल हॉस्पिटल्स आणि डिजिटल ट्विन्समुळे आरोग्य सेवेत मोठी क्रांती – पल्स परिषदेत तज्ज्ञांनी केले मत व्यक्त
Summary
मुंबई, दि.२७ : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित ‘पल्स’ परिषदेत व्हर्च्युअल हॉस्पिटल्स, डिजिटल ट्विन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवेत मोठी क्रांती घडत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. “व्हर्च्युअल हॉस्पिटल्स, डिजिटल ट्विन्स” या चर्चासत्रात डॉ. संजीव कुबकड्डी, […]
मुंबई, दि.२७ : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित ‘पल्स’ परिषदेत व्हर्च्युअल हॉस्पिटल्स, डिजिटल ट्विन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवेत मोठी क्रांती घडत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
“व्हर्च्युअल हॉस्पिटल्स, डिजिटल ट्विन्स” या चर्चासत्रात डॉ. संजीव कुबकड्डी, डॉ. महेश कप्पानियिल, डॉ.मयूर विभूती, पंकज राऊत तसेच मार्टिन बूस्मन या तज्ज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर सविस्तर मार्गदर्शन केले.
परिषदेत इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित पोर्टेबल वैद्यकीय उपकरणांचे थेट प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ईईजी, ईसीजी, रक्तदाब यांसारखी आरोग्य माहिती रिअल-टाइममध्ये सर्व्हरवर पाठवणाऱ्या या उपकरणामुळे डॉक्टरांना दूरस्थ पद्धतीने रुग्णांची स्थिती तपासणे शक्य होत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातही ही प्रणाली प्रभावी ठरणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ईईजी डिव्हाइसच्या साहाय्याने लक्ष, रिलॅक्सेशन आणि संज्ञानात्मक स्थितीचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
तसेच “व्हर्च्युअल डॉक्टर” या कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. ही प्रणाली रुग्णाशी संवाद साधून प्राथमिक माहिती गोळा करते, लक्षणांचे विश्लेषण करते आणि डॉक्टरांसाठी संक्षिप्त अहवाल तयार करते. विविध वैद्यकीय क्षेत्रांनुसार प्रशिक्षित करता येणारी ही प्रणाली आरोग्यसेवेत वेळ वाचविणारी ठरणार आहे.
डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णालयातील हवा प्रवाह आणि संसर्ग नियंत्रणावर आधारित अभ्यासही सादर करण्यात आला. 2D आणि 3D मॉडेलच्या सहाय्याने रुग्णालयातील रचना, व्हेंटिलेशन आणि निगेटिव्ह प्रेशर रूम यांचे नियोजन करून संसर्गाचा प्रसार कमी करण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट झाले.
व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानामुळे कार्डिओलॉजी क्षेत्रात मोठा बदल होत आहे. जागतिक परिषदांमध्ये डॉक्टर ‘अवतार’च्या माध्यमातून सहभागी होत असून, रुग्णांच्या हृदयाचे 3D डिजिटल ट्विन तयार करून शस्त्रक्रियेपूर्वी अचूक नियोजन केले जात आहे. 3D प्रिंटिंग आणि व्हीआर च्या साहाय्याने अनेक जटिल हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तज्ज्ञांनी सांगितले की, सध्या आरोग्य व्यवस्था ‘रिऍक्टिव्ह केअर’वर आधारित असली तरी डिजिटल ट्विन्स आणि व्हर्च्युअल हॉस्पिटल्समुळे ‘प्रोअॅक्टिव्ह केअर’कडे वाटचाल सुरू झाली आहे. लोकसंख्येचे जोखमीच्या स्तरानुसार वर्गीकरण करून आधीच उपाययोजना करणे शक्य होत आहे.
सिम एक्सचे संचालक मार्टिन बूस्मन यांनी व्हीआर आधारित प्रशिक्षणामुळे डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवासारखे शिक्षण देता येत असल्याचे स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराबाबत तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. पाश्चात्य डेटावर आधारित कृत्रिम बुद्धीमत्ता मॉडेल्स भारतीय रुग्णांसाठी पूर्णपणे उपयुक्त नसल्याने चुकीच्या निदानाचा धोका असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे भारतीय डेटावर आधारित विशेष कृत्रिम बुद्धीमत्ता मॉडेल्स विकसित करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
0000
