वॉटर स्क्रिनच्या माध्यमातून नागपूरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ‘म्युझिकल फाऊंटन’ शो चे विशेष आयोजन
Summary
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती नागपूर, दि. 22 : केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘म्युझिकल फाऊंटन शो’ च्या माध्यमातून नागपुरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर येणार आहे. धकाधकीच्या आयुष्यात हा शो विरंगुळा देत, आयुष्यातून ताणतणाव घालवून आनंद देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती
नागपूर, दि. 22 : केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘म्युझिकल फाऊंटन शो’ च्या माध्यमातून नागपुरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर येणार आहे. धकाधकीच्या आयुष्यात हा शो विरंगुळा देत, आयुष्यातून ताणतणाव घालवून आनंद देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ‘म्युझिकल फाऊंटन शो’चे आयोजन आज सायंकाळी फुटाळा तलाव येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.
नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी विविध विभागांचे मंत्रिमहोदय, वरिष्ठ अधिकारी, माध्यम प्रतिनिधी शहरात आले आहेत. त्यांच्यासाठी या ‘विशेष ट्रायल शो’चे आयोजन करण्यात आले होते.
‘म्युझिकल फाऊंटन शो’चे कौतुक करीत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अतिशय अप्रतिम फाऊंटन शो हा आज पहायला मिळाला आहे. जगातील सर्वात मोठे फाऊंटन नागपुरात आहे, ही अभिमानाची बाब आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ‘रोडकरी’ अशी ओळख आहे. हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना ‘रोडकरी’ संबोधायचे. रस्ते विकासाची अनेक दर्जेदार कामे त्यांनी राज्यात तसेच केंद्रात केली आहे. नागपुरच्याही विकासासाठीही त्यांचा प्रयत्न असतो. त्यातूनच हा फाऊंटन शो जगासमोर आला आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव घालवून अनेकांच्या आयुष्यात हा शो आनंदाची पेरणी करेल. केवळ देशातील नव्हे तर जगभरातील नागरिक हा फाऊंटन शो पहायला येईल. स्व. लता मंगेशकर यांचे नाव या ‘फाऊंटन शो’ला देण्याचा विशेष आनंद असल्याचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
‘फाऊंटन’ला स्व. लता मंगेशकर यांचे नाव देणार – नितीन गडकरी
देशभरात नावलौकीक मिळविणा-या ‘म्युझिकल फाऊंटन शो’ला स्व. लता मंगेशकर यांचे नाव देण्यात येणार आहे. या फाऊंटन शोच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंगेशकर कुटुंबीयांना लवकरच निमंत्रित करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.
या प्रकल्पासाठी 250 कोटी रुपये खर्च आला आहे. यापैकी 50 कोटी रुपये राज्य शासनाने दिले आहेत. तर उर्वरित निधी हा केंद्र शासनाने दिला आहे. फुटाळा परिसरातील भागाची विकासात्मक कामेही हाती घेण्यात आली आहे. फुटाळा तलावात लवकरच वॅाटर स्पोर्टस सुरू करण्यात येईल, असे श्री. गडकरी पुढे म्हणाले.
नागपूरला नवी ओळख मिळेल – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
म्युझिकल फाऊंटन शो’मुळे नागपूरला नवी ओळख मिळेल. माझ्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे. असेच उपक्रम भविष्यात राबविण्यासाठी आमचे सहकार्य राहणार असल्याचे श्री. नार्वेकर म्हणाले.
‘म्युझिकल फाऊंटन’ देशातील आयकॅानिक प्रकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर येथील फुटाळा तलावात साकारण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटन प्रकल्पाच्या बांधकामासाठी फ्रेंच आर्किटेक्चर, फवा-यांसाठी इटालियन आर्किटेक्चर आले असले तरी या प्रकल्पाचे खरे शिल्पकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच आहेत. सिंगापूर आणि दुबईपेक्षाही आकर्षक असा प्रकल्प नागपुरात असून देशातील हा आयकॅानिक प्रकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाने फक्त निधी उपलब्ध करून दिला. मात्र, नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून हा प्रकल्प साकारण्यात आला. उर्वरित कामासाठी राज्य सरकार पूर्णपणे मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
‘म्युझिकल फाऊंटन शो’विषयी…
– संगीत कारज्यांची लांबी 158 मी. असून हा जगातील सर्वात लांब तरंगता कारंजा आहे.
• ऑस्कर अवार्ड विजेते श्री. ए. आर. रहमान यांच्याव्दारा तयार केलेल्या ध्वनीफीतिद्वारे कारंज्यांचे सादरीकरण.
• पद्यश्री गुलजार यांच्या आवाजात नागपूर शहराच्या मागील 300 वर्षाच्या इतिहासाचे हिंदीमध्ये सादरीकरण.
• अभिनेते श्री. नाना पाटेकर यांच्या आवाजात नागपूर शहराच्या मागील 300 वर्षाच्या इतिहासाचे मराठीमध्ये सादरीकरण.
• सुप्रसिध्द अभिनेते श्री. अभिताभ बच्चन यांच्या आवाजात नागपूर शहराच्या मागील 300 वर्षाच्या इतिहासाचे इंग्रजीमध्ये सादरीकरण.
• ऑस्कर विजेते श्री. रसूल पुकुट्टी यांनी प्रकल्पाचे साऊंड डिझाईन तयार केले आहे.
• तामील सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रीमती रेवथी यांनी इतिहासाचे लेखांकन केले आहे.
• प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर अल्फाँस रॉय यांनी ग्राफीक डिझाईन्स केले आहे.
• थिम बेस्ड गाण्यांवर संगीत कारंज्याचे सादरीकरण
• फुटाळा तलाव शो चा एकूण कालावधी 35 मिनिटे आहे.
• आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्कॉच अवार्ड-2022 (सिल्वर) या प्रकल्पाने जिंकलेला आहे.
• काम सुरू करून पूर्ण करण्याचा कालवधी 1 वर्ष
• फुटाळा तलाव येथे फ्रान्स येथील क्रिस्टल गृपव्दारे फाऊंटनची उभारणी.