वैनगंगा नदीपात्रात रेतीचोरीचा पर्दाफाश करडी पोलिसांची मध्यरात्री कारवाई; ट्रॅक्टर-ट्रेलरसह 8.06 लाखांचा मुद्देमाल जप्त
Summary
भंडारा | प्रतिनिधी वैनगंगा नदीपात्रातील अवैध रेतीचोरीवर करडी पोलिसांनी जोरदार घाव घालत मध्यरात्री मोठी कारवाई केली. नदीपात्रातून बिनधास्तपणे रेती उपसा करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडत पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रेलरसह सुमारे ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही […]
भंडारा | प्रतिनिधी
वैनगंगा नदीपात्रातील अवैध रेतीचोरीवर करडी पोलिसांनी जोरदार घाव घालत मध्यरात्री मोठी कारवाई केली. नदीपात्रातून बिनधास्तपणे रेती उपसा करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडत पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रेलरसह सुमारे ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई दि. 19 जानेवारी 2026 रोजी पहाटे 1.30 ते 2.50 वाजेदरम्यान मौजा निलज खुर्द परिसरातील वैनगंगा नदीपात्रात करण्यात आली. करडी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई निखील रंजीत कोचे (ब.नं. 287) हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना नदीपात्रात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तपासणीअंती निळ्या रंगाचा सोनालिका ट्रॅक्टर (क्रमांक MH-35-T-3941) नदीपात्रातून अवैधरित्या रेती उपसा करत असल्याचे आढळून आले.
सदर ट्रॅक्टरला विनानंबरची शेंदरी रंगाची ट्रेलर जोडलेली होती. ट्रॅक्टरमध्ये अंदाजे एक ब्रास रेती भरलेली असून कोणताही उत्खनन किंवा वाहतूक परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपीने शासनाच्या मालकीच्या गौण खनिजाची चोरी करत पर्यावरणाचे गंभीर नुकसान केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन करडी येथे गुन्हा क्रमांक 10/2026 अन्वये
कलम 303(2), 49 भारतीय न्याय संहिता,
कलम 47, 48 महाराष्ट्र महसूल अधिनियम, तसेच
कलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये –
सोनालिका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर – अंदाजे ₹7,00,000
विनानंबरची शेंदरी रंगाची ट्रेलर – ₹1,00,000
अंदाजे 1 ब्रास रेती – ₹6,000
असा एकूण ₹8,06,000 रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत फरताडे (मो. 8329408395) करीत असून, वैनगंगा नदीपात्रातील रेतीमाफियांवर पोलिसांचा करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
