वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग व आयुष संचालनालयाच्या वतीने अवयवदान दिवस साजरा
मुंबई, दि. 3 : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्या वतीने राष्ट्रीय (भारतीय) अवयवदान दिनानिमित्त आज मुंबईत अवयवदान जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अवयवदान करण्याचे आवाहन केले.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष आयुक्त राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रमण घुंगराळेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय मुंबई, आर. ए. पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, मुंबई व मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय यांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.
अवयव दान जनजागृती प्रभातफेरी नरिमन पॉईंट ते यशवंतराव चव्हाण सेंटर पर्यंत काढण्यात आली. प्रभातफेरीमध्ये ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, शासकीय दंत महाविद्यालय मुंबई, आर.ए.पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय मुंबई व मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय यांचे विद्यार्थी, अध्यापक व इतर मान्यवरांचा समावेश होता.
यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागाद्वारे अवयवदात्यांचा गौरव करण्यात आला. तसेच जुलै महिन्यात विभागाधिनस्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषक वितरण करण्यात आले.
अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे अनेकांना नवीन जीवन मिळते. त्यामुळे या अवयवदान मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी यावेळी केले.
प्रधान सचिव श्री. वाघमारे यांनी राज्यातील व देशातील अवयव दानाची परिस्थिती व त्यावर भविष्यात करावयास लागणाऱ्या धोरणाबाबत विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्त राजीव निवतकर यांनी केले. राज्यात सुरू असलेल्या जनजागृती कार्यक्रमाचे व विभागाद्वारे अवयवदान सक्षम करण्याकरीता घेण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमात कार्यक्रमाचे समन्वय मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती मृणाल पोतदार व विशेष कार्य अधिकारी डॉ. राकेश वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डिंपल पाडावे व डॉ. रेवत कानिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे यांनी केले.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग व राज्य शासनाचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आजचा भारतीय अवयवदान दिवस हा मुंबईप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शासकीय वैद्यकीय, दंत व आयुष महाविद्यालयातर्फे राज्यभर साजरा करण्यात आला. यामध्ये राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, दंत व आयुष महाविद्यालयामार्फत अवयवदान निमित्त विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.