वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश
मुंबई, दि. 24: कार्यादेश दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात विलंब करणाऱ्या कंत्राटदारांमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा कंत्राटदारांची माहिती घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आज आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
पैठण तालुक्यातील दरकवाडी, औरंगपूरवाडी, रहाटगाव येथील ३३/११ के.व्ही.चे उपकेंद्र उभारण्याच्या मागणीच्या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी मंत्री संदिपान भुमरे यांना दिली.
पैठण तालुक्यातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम त्वरित करण्यात यावे तसेच सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे हे प्रत्यक्ष तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.