BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

विविध सुविधांतून आरोग्ययंत्रणेचे सक्षमीकरण – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर सुपर स्पेशालिटी परिसरात 100 खाटांचे स्वतंत्र रुग्णालय; ‘इर्विन’मध्ये रक्तपेढी व ‘ओपीडी’चे विस्तारीकरण; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Summary

अमरावती, दि. 24 : कोविड-19 साथ लक्षात घेऊन दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्याचअंतर्गत इर्विनमधील रक्तपेढी व ओपीडीच्या विस्तारीकरणासह सुपर स्पेशालिटी परिसरात 100 खाटांचे स्वतंत्र रुग्णालय निर्माण होत आहे. पुढील काळात उत्तम उपचार […]

अमरावती, दि. 24 : कोविड-19 साथ लक्षात घेऊन दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्याचअंतर्गत इर्विनमधील रक्तपेढी व ओपीडीच्या विस्तारीकरणासह सुपर स्पेशालिटी परिसरात 100 खाटांचे स्वतंत्र रुग्णालय निर्माण होत आहे. पुढील काळात उत्तम उपचार सुविधांसाठी या सुविधा उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

जिल्हा रुग्णालयात सुमारे सव्वा कोटी रुपये निधीतून रक्तपेढी व बाह्यरुग्ण विभागाचे विस्तारीकरण, तसेच  अमेरिकन इंडिया फौंडेशनच्या सहकार्याने पुढील दोन महिन्यांत 100 खाटांचे स्वतंत्र रूग्णालय उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, महापौर चेतन गावंडे, जि. प. आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, केवळ कोरोनाकाळातच नव्हे, तर दीर्घकाळापर्यंत उत्तम सुविधा देऊ शकेल अशी भक्कम आरोग्य यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 100 खाटांच्या इस्पितळासाठी अमेरिकन इंडिया फाऊंडेशनकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सहकार्य मिळाले असून, रुग्णालयाचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. ही उपचार सुविधांच्या दृष्टीने अमरावती जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी होणार आहे. ग्रामीण भागातही उपचार सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे.

पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा रुग्णालयातील कार्यक्रमात डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांच्याशीही संवाद साधला. त्या म्हणाल्या की, जवळजवळ गेले सव्वा वर्ष कोरोना साथीच्या काळात डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी अविश्रांत काम करत आहेत. त्यांचे योगदान अमूल्य आहे. मात्र, अजूनही साथ संपलेली नाही. कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. ती पाहता आता थांबून चालणार नाही. रुग्णसेवा अखंडित ठेवत साथ नियंत्रणासाठी आवश्यक ती सर्व कामे सगळ्यांनी समन्वयाने पार पाडायची आहेत. रुग्णसेवेहून मोठे दुसरे कार्य नाही.

स्वतंत्र रुग्णालयाच्या जोता बांधणीचे भूमिपूजन

सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरात स्वतंत्र रुग्णालयाच्या जोता बांधणीचे भूमिपूजन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम सुरु असून, 40 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. अमेरिकन इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने फायबर सिमेंट फ्लोअरिंग, ॲल्युमिनिअम कंपोझिट पॅनेलच्या सहकार्याने ही इमारत उभारण्यात येणार आहे. त्याचा तयार ढाचा बाहेरून आणून तो बसविण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षित इमारत गतीने उभी राहू शकेल. रुग्णालयाची इमारत ऑक्सिजन सुविधेसह सर्व अद्ययावत सोयींनी सुसज्ज असेल.

फोर झोन स्ट्रॅटेजीवर आधारित रचना

रुग्णालयाची रचना फोर झोन स्ट्रॅटेजीवर आधारित असेल. झोन एकमध्ये डॉक्टर्स व हेल्थ केअर वर्कर्सचे कार्यालय, थांबण्याची व्यवस्था असेल. झोन दोनमध्ये बाह्य रुग्ण विभाग व आरटीपीसीआर, तसेच अँटिजेन टेस्टिंगच्या सुविधा असेल. तसेच तिथे लक्षणे असणाऱ्‍या, मात्र चाचणी अहवाल प्राप्त न झालेल्या रुग्णांचा कक्ष असेल. झोन तीनमध्ये बाधितांसाठी विलगीकरण व उपचार कक्ष असेल. झोन चारमध्ये व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन पाईपलाईन, काँन्सट्रेटर्स, अतिदक्षता कक्ष उपलब्ध असेल. तिथे गंभीर रुग्णांवर उपचार होतील.

त्याशिवाय, प्रतीक्षा कक्ष, कन्सल्टेशन रुम, एक्झामिनेशन वॉर्ड आदी कक्षही असतील. रुग्णालयात हवा खेळती राहण्यासाठी टर्बो व्हेंटिलेटर्स असतील. त्याशिवाय, आयसीयू वॉर्ड पूर्णत: वातानुकूलित असेल.

संपूर्ण प्रकल्पाचे क्षेत्र 15 हजार फूट असून, त्यात आयसोलेशन वॉर्डचे क्षेत्र 5 हजार 600 फूट व सर्विस एरिया 7 हजार 800 फुटांचा आहे. संपूर्ण रुग्णालय उभारणी ‘अमेरिकन इंडिया’कडून होत असून, हे रुग्णालय लवकरच उभे राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *