BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

विधानसभा लक्षवेधी

Summary

ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रेथरेन ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर उद्यानाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश – मंत्री उदय सामंत मुंबई, दि. ०४ : डहाणू शहरातील मौजे मल्याण येथील जनरल ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रेथरेन ट्रस्टच्या मालकीच्या जागेवरील दोन इमारती अत्यंत धोकादायक झालेल्या […]

ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रेथरेन ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर उद्यानाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ०४ : डहाणू शहरातील मौजे मल्याण येथील जनरल ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रेथरेन ट्रस्टच्या मालकीच्या जागेवरील दोन इमारती अत्यंत धोकादायक झालेल्या होत्या. या इमारतींच्या शेजारी लोकांची वर्दळ व वास्तव्य असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या  दोन इमारती  डहाणू नगर परिषदेने निष्कासित करण्याची कारवाई सुरु केली आहे. या इमारतीच्या जागेवर उद्यान करण्याबाबत प्रस्ताव डहाणू नगरपालिकेने पाठवण्याचे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

याबाबत सदस्य विनोद निकोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरी, राजेश पाटील, रईस शेख यांनीही सहभाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, डहाणू नगरपरिषदेने धोकादायक घोषित केलेल्या कोणत्याही मालमत्ता ऐतिहासिक स्वरूपाच्या नसून नगरपरिषद हद्दीतील एकही इमारत ऐतिहासिक इमारतींच्या यादीमध्ये समाविष्ट नाही. या सर्व जीर्ण इमारती खासगी मालकीच्या असून घरमालक व भाडेकरूंच्या वादामध्ये या इमारतींची वर्षानुवर्षे दुरुस्ती, डागडुजी करण्यात आलेली नाही. डहाणू शहराची मंजूर विकास योजना, अधिनियमातील तरतुदी व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नगरपरिषदेने कारवाई केली असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

००००

 

औद्योगिक गुंतवणूक वाढेल – उद्योग मंत्री उदय सामंत

राज्यात सात ठिकाणी एमआयडीसीची प्रादेशिक कार्यालये होणार

मुंबई, दि.4 : नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात नव्याने उद्योग येत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने काही उद्योग नव्याने येत असल्याची माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.        राज्यातील बारामती, अहमदनगर, अकोला, चंद्रपूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची प्रादेशिक कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य राजेश पाडवी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. नवापूर औद्योगिक क्षेत्रात नवे उद्योग येत आहेत. येत्या काळात या औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

000

 

आदर्श पतसंस्थेसह महिला बँकेच्या ठेवीदारांना ठेवींच्या परताव्यासाठी कार्यवाही – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई, दि. 4 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना मिळण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, आदर्श पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे या संस्था अडचणीत आल्या. पतसंस्थेच्या लेखा परीक्षण आणि विशेष अहवालात अपहार, गैरव्यवहार, फसवणूक, विनाकारण कॅश क्रेडिट  कर्जवाटप आदी गंभीर बाबी समोर आल्या. याप्रकरणी ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच संबंधितांवर कार्यवाही करण्याबाबत सहकार विभागाची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. संस्थेच्या मालकीच्या मालमत्तांपैकी ३ मालमत्तांची विक्री करण्यात आली आहे. त्यातून ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी सदस्य प्रकाश सोळंके, बबनराव लोणीकर, नारायण कुचे यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.

०००

पिंपरी – चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या हद्दीतील भूखंड फ्री होल्डबाबत तपासणी करून निर्णय घेणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 4 : राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेवर आर्थिक भार येत नसल्याची तपासणी करुनच पिंपरी – चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या हद्दीतील भूखंड  मालमत्ता ‘फ्री होल्ड’ करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

याबाबत सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य माधुरी मिसाळ यांनीही सहभाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या विकसित भूखंडाच्या अनुषंगाने भूखंडाची हस्तांतरणाबाबतची, मयत भूखंड धारकाचे वारस अभिलेखावर घेण्याची त्याचप्रमाणे वित्तीय संस्थेला ना हरकत देण्याची कार्यवाही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रचलित नियमानुसार विहीत मुदतीत करण्यात येत आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

नागरी क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण तयार करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 4 : राज्यात नागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे संकलन करण्यात येते. प्रत्येक शहरात कचरा निर्मूलनात वाढ झाली असून कचऱ्याचे संकलन वाढले आहे. ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात येऊन कचरा उचलण्यात येत आहे. राज्यात नागरी क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्वंकष धोरण तयार येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

यासंदर्भात सदस्य अमित देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या उत्तरात सदस्य प्राजक्त तनपुरे, मनीषा चौधरी, राहुल पाटील, आदित्य ठाकरे, धीरज देशमुख यांनी भाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नगर पंचायती, नगरपालिका, महानगरपालिका या सर्व नागरी क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाचा धोरणात समावेश असेल. तसेच मोठ्या गावांतील कचऱ्याबाबतही यामध्ये विचार करण्यात येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. लातूर शहरातील कचरा न उचलणे, अस्वच्छता, महानगरपालिकेमार्फत राबविलेली निविदा प्रक्रिया, सध्याच्या संस्थेला स्वच्छतेचे वाढवून दिलेले कंत्राट, देयकाची अदायगी याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल. सध्याच्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले असून पुढील निविदा प्रक्रियेत संस्थेला स्थान देण्यात आले नाही. लातूर शहरात ओला व सुका कचरा एकत्र गोळा करण्यात आला. यासाठी संबंधित कंत्राटदार संस्थेला 27 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेतील 15 वॉर्डमध्ये वॉर्ड अधिकारी नसल्याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल. परभणी महापालिकेतील तक्रारीनुसार येथील अस्वच्छतेची चौकशी करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *