नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

विधानपरिषद लक्षवेधी

Summary

अनधिकृत उत्खननावर प्रतिबंधासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील  नागपूर, दि. २७ : राज्यातील गौण खनिज पट्ट्यातून अनधिकृत उत्खननावर प्रतिबंध यावा, यासाठी १५ जानेवारीपर्यंत नवीन धोरण आणले जाणार आहे. या नवीन धोरणात ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील […]

अनधिकृत उत्खननावर प्रतिबंधासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 

नागपूर, दि. २७ : राज्यातील गौण खनिज पट्ट्यातून अनधिकृत उत्खननावर प्रतिबंध यावा, यासाठी १५ जानेवारीपर्यंत नवीन धोरण आणले जाणार आहे. या नवीन धोरणात ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यात अनधिकृत खडीक्रशर धारकांकडून अवैध उत्खनन प्रकरणी प्रा.राम शिंदे यांनी लक्षवेधी मांडली होती, यास मंत्री श्री.विखे पाटील यांनी उत्तर दिले.

कर्जत तालुक्यात झालेल्या अवैध उत्खनन प्रकरणी संबंधित खडीक्रशर धारकांकडून ४८ कोटी १९ लाख ६८ हजार ५२५ रुपयांची दंडात्मक रकमेची कार्यवाही करण्यात आली असल्याचे श्री.विखे पाटील यांनी सांगितले. या अवैध उत्खनन प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून संबधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. या लक्षवेधीवरील चर्चेत विधानपरिषद सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

0000

एमपीएससीच्या ४३० जाहिराती प्रसिद्ध, मुलाखत प्रकिया लवकरात लवकर राबविली जाईल – मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. २७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत सरळसेवा भरतीच्या एकूण ४३० जाहिराती प्रसिद्ध केल्या आहे. यात इतर विभागांकडून झालेल्या मागणीनुसार तसेच दिव्यांग आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या  उत्तरात सांगितले.

दिव्यांगांसाठी शासकीय सेवेतील सर्व प्रवर्गासाठी शासनाने निश्चित केलेल्या वयोमर्यादेस आव्हान देणारी  एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे शासन सध्या राबवित असलेल्या या भरती प्रक्रियेला खीळ बसू नये, त्यामुळे उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा  विचार करता येणार नाही, असे मंत्री श्री.केसरकर यांनी उत्तरात सांगितले. त्याचबरोबर, उमेदवारांच्या मुलाखती तात्काळ घेण्यासंदर्भात आयोगाला सूचित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी या संदर्भातील  लक्षवेधी उपस्थित केली होती. सदस्य अभिजित वंजारी यांनीही यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

000

घाटकोपर पोलीस वसाहतीच्या जागेवर अनियमितता झाली असल्यास कारवाई करणार – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २७ : घाटकोपर येथे पोलीस वसहतीसाठी भूखंड आरक्षित असून या भूखंडावर अनियमितता झाली असल्यास याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

घाटकोपर पोलीस वसाहतीच्या राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत पेट्रोल पंप उभारल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री सामंत यांनी सांगितले की, घाटकोपर येथील भूखंडावर बृहन्मुंबई विकास योजना २०३४ नुसार पोलीस कर्मचारी वसाहत असे नामनिर्देशन दाखविले आहे. काही भाग खेळाचे मैदान, मनोरंजन मैदान यासाठी आरक्षित आहे. हा भूखंड महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्या मालकीचा आहे. पोलिसांना कल्याण निधी उभारण्याचा हक्क आहे. त्यानुसार भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीचे इंधन भरणा केंद्र उभारणीसाठी पोलीस आयुक्त रेल्वे मुंबई यांनी बृहन्मुंबई महापालिकेत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे.

पेट्रोल पंपासाठी भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अग्निशमन दल, सीआरझेड, एमएमआरडीए, ट्री ॲथॉरिटी, जल अभियंता, रेन वॉटर हार्वेस्टिंग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बँक हमी, लेआऊट मंजुरी, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक, मुंबई पोलीस ना हरकत, वाहतूक शाखा, इलेक्ट्रिक,औद्योगिक आणि आरोग्य संचालनालय यांची परवानगी घेण्यात आली आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी मनपाकडे अर्ज सादर केला आहे. यामध्ये अनियमितता असेल तर कारवाई करण्याची हमी मंत्री श्री सामंत यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य डॉ. रणजित पाटील यांनी सहभाग घेतला.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *