विद्युत केंद्राच्या गॅस पाईपलाईनवर रात्री घातपाताचा प्रयत्न उधळला ऑक्सिजन व एलपीजी सिलिंडरसह साहित्य जप्त, मोठा अनर्थ टळला
Summary
चंद्रपूर — चंद्रपूर येथील महाऔद्योगिक विद्युत केंद्राच्या अत्यंत महत्त्वाच्या गॅस पाईपलाईनवर रात्रीच्या वेळी घातपात करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दि. 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11.00 ते पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास, […]
चंद्रपूर — चंद्रपूर येथील महाऔद्योगिक विद्युत केंद्राच्या अत्यंत महत्त्वाच्या गॅस पाईपलाईनवर रात्रीच्या वेळी घातपात करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
दि. 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11.00 ते पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास, विद्युत केंद्रातून राख वाहून नेणाऱ्या पाईपलाईन परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा विभागाने तात्काळ विशेष गस्त पथक तैनात केले. तपासादरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी पाईपलाईन कापण्यासाठी गॅस कटरसह साहित्य आणून ठेवले असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान घटनास्थळी 04 ऑक्सिजन सिलिंडर, 02 एलपीजी सिलिंडर, गॅस कटर, पाईप्स व इतर साहित्य आढळून आले. हे साहित्य वापरून पाईपलाईन कापण्याचा प्रयत्न झाल्यास विद्युत केंद्र बंद पडण्यासह मोठी आर्थिक व जीवितहानी होण्याची शक्यता होती.
सुरक्षा विभागाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी, संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले. पाईपलाईन सुरक्षित राहिल्याने विद्युत केंद्राचे कामकाज सुरळीत सुरू राहिले असून मोठा धोका टळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी पडोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळी मिळालेल्या साहित्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
महाऔद्योगिक व सार्वजनिक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होणारे असे प्रकार अतिशय गंभीर असून, यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
