गोंदिया महाराष्ट्र शिक्षण हेडलाइन

विद्यार्थ्यांनी भविष्यातील बदलांना सामोरे जावे – हरीओम पुनियानी सरस्वती विद्यालयात वार्षिकोत्सवाचे थाटात उद्घाटन

Summary

अर्जुनी/मोर. | प्रतिनिधी संस्कार आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालत आजची तरुण पिढी अत्यंत होतकरू आहे. विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्याने वाटचाल करावी, भविष्यातील बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी तसेच मनातील नकारात्मक भावना दूर ठेवून स्पर्धांना धैर्याने सामोरे जावे, […]

अर्जुनी/मोर. | प्रतिनिधी
संस्कार आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालत आजची तरुण पिढी अत्यंत होतकरू आहे. विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्याने वाटचाल करावी, भविष्यातील बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी तसेच मनातील नकारात्मक भावना दूर ठेवून स्पर्धांना धैर्याने सामोरे जावे, असे प्रतिपादन डॉ. हरीओम पुनियानी, प्राध्यापक व वाणिज्य विभाग प्रमुख, हिस्लॉप कॉलेज नागपूर यांनी केले.
स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जी.एम.बी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, एस.डी. कॉन्व्हेंट आणि सरस्वती विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिकोत्सव सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. बल्लभदास भुतडा होते. उद्घाटक म्हणून हेमंत वसू, माजी कर्णधार – विदर्भ रणजी क्रिकेट संघ, नागपूर हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाश भैय्या, संस्थासचिव सर्वेश भुतडा, प्राचार्य जे. डी. पठाण, उपप्राचार्या अर्चना गुरुनुले, पर्यवेक्षक शिवचरण राघोते, वार्षिकोत्सव संयोजक प्रा. योगेंद्र गौतम, दिपाली गोल्लीवार तसेच संस्थेचे पदाधिकारी, विविध शाळांचे प्रमुख, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर संस्थेच्या दिवंगत पदाधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उद्घाटक हेमंत वसू यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. कठोर परिश्रमाच्या जोरावर महेंद्रसिंग धोनी, यशस्वी जयस्वाल, उमेश यादव यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. वार्षिकोत्सवासारखे स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपप्राचार्या अर्चना गुरुनुले यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. प्राचार्य जे. डी. पठाण यांनी विद्यार्थ्यांनी सातत्य, संयम व धैर्य बाळगावे, यश-अपयश ही जीवनाची प्रक्रिया असून प्रयत्न कधीही थांबवू नयेत, असे मार्गदर्शन केले. कोषाध्यक्ष जयप्रकाश भैय्या यांनी वार्षिकोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. बल्लभदास भुतडा यांनी शाळेच्या प्रगतीत शिक्षक, विद्यार्थी, पालक व संस्थेच्या सर्व घटकांचा मोलाचा सहभाग असल्याचे सांगून विद्यालयाचा प्रगतीचा आलेख असाच वाढत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
वार्षिकोत्सवाचे औचित्य साधून शैक्षणिक, क्रीडा, विज्ञान व योगा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रौप्य पदक व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
एच.एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये विज्ञान शाखेतून बोर्डातून प्रथम आलेले वृषभ गजानन गभने (३० ग्रॅम रौप्य पदक), कला शाखेतून जिल्ह्यात द्वितीय आलेल्या रांची भीमराव लांडगे (१५ ग्रॅम), शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रदर्शनांचे उद्घाटन
कार्यक्रमानंतर विज्ञान प्रदर्शनी, कला व चित्रकला प्रदर्शनी, पाककला व रांगोळी प्रदर्शनी यांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील आस्था दुपारे व नेहा माखिजा यांनी केले, तर आभार प्रदर्शन जी.एम.बी. विद्यालयाच्या प्राचार्या शाव्या जैन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *