वांद्रे किल्ला परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करा – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
Summary
मुंबई, दि.१५ : वांद्रे येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित रित्या पर्यटन करता यावे यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे […]
मुंबई, दि.१५ : वांद्रे येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित रित्या पर्यटन करता यावे यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
एच पश्चिम वॉर्ड, वांद्रे येथे आज पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी आमदार ॲड.आशीष शेलार,सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्ग सेवक, सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभाग चे रोहित देशमुख यांनी ऐतिहासिक वांद्रे किल्ल्याचे पावित्र्य जपून येथील परिसरात कायदा व सुव्यवस्थेची गरज आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वातावरणासाठी उपाययोजना कराव्यात अशी तक्रार केली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री श्री. लोढा यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी तसेच वांद्रे किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्यात यावे अशा सूचना केल्या.
पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले, खार स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रशासनाने कार्यवाही करावी. तसेच महानगर गॅस ची पॉईप लाईन येत नसल्यामुळे या विषयी महानगर पालिका, मेट्रो व महानगर गॅस यांची संयुक्त बैठक मंगळवारी घेण्यात येईल व यावरती त्वरित उपाय काढण्यात येईल. खार रोड पश्चिम येथील राकेश मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एस. आर. ए. ने दहा दिवसात प्राथमिक शाळा मुंबई महापालिकेला पूर्ण कार्यवाही करुन हस्तांतरित करावी. तसेच शंकर दीप हाउसिंग सोसायटीला मुंबई महापालिकेने सात दिवसात पाण्याचे कनेक्शन देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी दिले
नागरिकांनी २४२ विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले.तर यामधील १०५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.
‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम दि. १९ ऑक्टो रोजी पी नॉर्थ वॉर्ड, मालाड (पश्चिम) येथे होणार असून. नियोजित रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.