वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार केल्याबद्दल आणखी एकास अटक
मुंबई, दि. २२ : वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार केल्याबद्दल आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केल्याबद्दल आणखी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. संतोषकुमार धांदरिया असे त्यांचे नाव आहे. त्यांनी संतोष सिल्क मिल्स. मे. स्वीटी एंटरप्रायझेस, मे. भामवती क्रिएशन अॅड कीर्ती एजन्सी या नावे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, 2017 अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत.
ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्री व्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. संतोषकुमार धांदरिया यांनी दिलीप टिबरेवाल व इतर यांच्याकडून रू.119.61 कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगे, कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रु. 8.16 कोटी इतक्या रक्कमेचा बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतला. दिलीप टिबरेवाल या व्यक्तीस वस्तू व सेवाकर विभागाने यापूर्वीच खोटी देयके निर्गमित करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
संतोषकुमार धांदरिया यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर कायदा 2017, च्या कलम 69 अन्वये आज अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने संतोषकुमार धांदरिया यांना दि.30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने याद्वारे करदात्यांस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यानुसार कर भरणा व इतर बाबींची पूर्तता नियमितपणे करण्याबाबत पुनःश्च एकदा आवाहन केले आहे.