वऱ्हा येथील नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून द्या – पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला आदेश
अमरावती, दि. १२ : जिल्ह्यातील तिवसा परिसरातील वऱ्हा गावात वादळामुळे अनेक घरांचे नुकसान आणि पडझड झाली. या नुकसानीची पाहणी महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधून दिलासा दिला.
वऱ्हा येथे घरांचे वादळामुळे नुकसान झाले. त्याची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी याठिकाणी आज भेट देऊन नुकसानग्रस्तांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना अन्नधान्यवाटप करून मदतीचा हातही दिला.
वऱ्हा येथील नुकसानीची पाहणी करून पंचनामे व सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तत्काळ करून संबंधिताना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळेल, यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करण्यात येईल. प्रशासनाने तत्काळ आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले. वऱ्हा येथे ५० हून अधिक घरांचे नुकसान वादळामुळे झाल्याची माहिती तहसीलदार योगेश फरताडे यांनी दिली.