*वऱ्हाडात ओबीसी ‘आघाडी’ सक्रिय होणार* *पटोले-पवळ भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा*
Summary
अकोला : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राष्ट्रवादीचे वऱ्हाडातील नेते रामेश्वर पवळ यांनी मुंबईत भेट घेतली. ओबीसी नेत्यांच्या अर्ध्या तासाच्या या भेटीत राजकीय, सामाजिक आणि समाजातील प्रश्नांवर चर्चा झाली. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीने वऱ्हाडात येत्या […]
अकोला :
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राष्ट्रवादीचे वऱ्हाडातील नेते रामेश्वर पवळ यांनी मुंबईत भेट घेतली. ओबीसी नेत्यांच्या अर्ध्या तासाच्या या भेटीत राजकीय, सामाजिक आणि समाजातील प्रश्नांवर चर्चा झाली. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीने वऱ्हाडात येत्या काळात ओबीसी फॅक्टर अधिक सक्रिय होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ‘ही केवळ सदिच्छा भेट होती,’ असे पवळ यांनी म्हटले असले तरी नवी राजकीय खेळी यातून खेळली जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते म्हणून रामेश्वर पवळ यांची ओळख आहे. अनेक बड्या नेत्यांना पक्षात आणून राष्ट्रवादीला बळ मिळवून देण्याचे काम पवळ यांनी केले आहे. कुठल्याही पदाविना थेट शरद पवार यांच्याशी संपर्क असल्याने त्यांचे पक्षात अधिक वजन असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. वंजारी समाजाचे असलेले पवळ हे ओबीसी नेते म्हणूनही ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी वंजारी समाजाला विदर्भात अपेक्षित स्थान राजकीय पक्षांकडून मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती. यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. हे सारे घडत असतानाच ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. हीच संधी साधून समाजाच्या प्रश्नांकडे राष्ट्रवादीसह मित्र पक्षानेही अधिक लक्ष केंद्रीत करावे या उद्देशाने त्यांनी पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी; मंगळवारी मुंबईत भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. खामगावात ओबीसी महासंघाचा मेळावा, पटोले आणि पवळ यांनी ओबीसी प्रश्नांवरून होणारी भेट ही वऱ्हाडातील वेगळ्या राजकारणाची नांदी मानली जात आहे. पवळ नेतृत्त्व करीत असलेल्या वंजारी समाजाची एकट्या विदर्भात दहा लाखांवर लोकसंख्या आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेराजा मतदारसंघातून तोताराम कायंदे हे वंजारी समाजाच्या मतांच्या भरवशावर अपक्ष निवडणूक आले होते.
कोण आहेत रामेश्वर पवळ?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील रामेश्वर पवळ यांनी पक्षाला संपूर्ण वऱ्हाडात वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. संघटन बांधणी कौशल्यातून पक्षाला मानाचे स्थान मिळवून दिले. कधी काळी शिवसेनेचा वाघ म्हणून अकोल्यात ओळख असलेल्या गुलाबराव गावंडे यांना राष्ट्रवादीत आणण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंध असल्याने वंचित बहुजन आघाडीतील माजी आमदार हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. राष्ट्रवादी सेवादल अकोला जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलात अमरावती विभागाचे विभागीय समन्वयक, दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कार्यकारिणीत प्रदेश संघटन सचिव, अकोला लोकसभा मतदारसंघात २००४मध्ये पक्ष निरीक्षक, सूनिलजी तटकरे यांच्या कार्यकारिणीत प्रदेश चिटणीस, प्रदेश संघटक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईतील भेट ही सदिच्छा होती. यात कुठलीही राजकीय भावना नव्हती. ओबीसी समाजातील एक व्यक्ती बड्या पदावर गेली. शिवाय काँग्रेस हे राष्ट्रवादीचे मित्र पक्ष असल्याने ही भेट घेतली. मी राष्ट्रवादीतच आहे आणि राहणार. आमची निष्ठा शरद पवार यांच्याशी जुळलेली आहे.
रामेश्वर पवळ
राष्ट्रवादीचे नेते
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर