वर्धा येथील लॉयड स्टीलच्या परिसरात जम्बो हॉस्पिटल उभारणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत जिल्ह्यात एकूण 8128 बेडस दररोज ऑक्सिजनच्या ४ टँकरचा नियमित पुरवठा
Summary
नागपूर दि 19:- कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी वर्धा येथील लॉयड स्टील कंपनीच्या परिसरात ऑक्सिजन मोठया प्रमाणात उपलब्ध् होऊ शकतो. तज्ज्ञ चमुनी त्याठिकाणाची पाहणी केली असून तिथे जम्बो हॉस्पिटल उभारणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत […]
नागपूर दि 19:- कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी वर्धा येथील लॉयड स्टील कंपनीच्या परिसरात ऑक्सिजन मोठया प्रमाणात उपलब्ध् होऊ शकतो. तज्ज्ञ चमुनी त्याठिकाणाची पाहणी केली असून तिथे जम्बो हॉस्पिटल उभारणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाचा वाढत्या संसर्गाला थांबविण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
मानकापूर येथील क्रीडा संकुलात शहरासाठी 800 ते 1000 बेडची क्षमता असलेले कोविड रूग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
महानिर्मितीच्या कोराडी,खापरखेडा येथील विदयुत केंद्रात ओझोन प्लांट आहे. ओझोन वायुतून ऑक्सिजन मिळविण्यासाठी येथे कॉम्प्रेसर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्ली, फरीदाबाद,चीन, व अमेरिका सारख्या देशांमध्ये संपर्क करण्यात आला आहे. यासाठी चीनच्या कंपनीशी बोलणे झाले असून हा प्रकल्प कार्यन्वित झाल्यास कोराडीतून एक हजार सिंलीडर ऑक्सिजन दररोज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉम्प्रेसर बसविल्यानंतर खापरखेडा केंद्रातून दररोज 300 सिलिंडर ऑक्सिजन मिळू शकतो. मात्र कॉम्प्रेसर बसविण्यासाठी साधारणत: एक महिना लागू शकतो. प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करत असून हिंगणा एमआयडीसी परिसरातील ऑक्सिजन प्लांटची तपासणी केली मात्र त्याची उत्पादन क्षमता कमी आहे. पाचपावली कोविड केअर सेंटर मध्ये पी. एम. केअर फंडातून ऑक्सिजन टँकची निर्मिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तातडीची योजना म्हणून दररोज 4 टॅंकर ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
सद्यस्थितीत शक्य असेल तिथून ऑक्सिजन उपलब्ध करण्यात येत असून दीर्घकालीन योजनांसाठी मोठया क्षमतेचे प्लांट उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा येथील श्री. क्षीरसागर यांच्या कंपनीला रेमेडीसीवीर उत्पादनाचे लायसन्स मिळाले आहे. प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यास 10 मे पर्यतचा वेळ लागू शकेल,असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात 8 हजार 128 बेडस उपलब्ध
गरजू रूग्णांना बेड मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यांच्या समन्वयाने बेड मॅनेजमेंट करण्यात येत आहे. जिल्हयात एकूण 8 हजार 128 बेडस उपलब्ध आहे.
ग्रामीण भागात 31 रूग्णालयांमध्ये 203 साधे बेड, 1247 ऑक्सिजन बेड तर 88 व्हेटींलेटर बेड आणि कोविड केअर सेंटरमध्ये 513 बेड आहेत. ग्रामीण भागात एकूण 1792 बेड उपलब्ध असून 436 ने बेड संख्या वाढविली आहे. तर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये 4014 बेड आहेत. मेयो, मेडीकल, एम्स मध्ये एकूण 1800 बेड आहेत. वाढती रूग्णसंख्या पाहता शहरातील 23 हॉटेल्समध्ये कोविड केअर सेंटरसाठी परवानगी देण्यात आली आहे.
लसीकरण हाच रामबाण उपाय असून आजपर्यत 7 लाख 40 हजार 65 नागरिकांनी लसीचा पहीला व दुसरा डोस घेतला आहे. भविष्यात सर्वांचे लसीकरण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. हवेतून ऑक्सिजन घेऊन 100 बेडला पुरेल एवढा ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट मेयो व मेडीकलमध्ये सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
शहरी भागासाठी 250 आणि ग्रामीण भागासाठी 500 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर व 200 व्हेटींलेटर दोन आठवडयात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन संकल्पनेच्या डोझी उपकरणाने दूरस्थ पध्दतीने रूग्णांचे निरीक्षण करून उपचार करण्यात येत असून रूग्णांना आणि वैद्यकीय चमुला याचा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरटीपीसीआर चाचणीचा निकाल 30 मिनिटात देणाऱ्या ‘क्रिस्पर फेलुदा’ मशीनबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी बोलणे झाले असून नागपुरात ती लवकरच प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.आज जिल्ह्यात 3000 रेमेडीसिवर इंजेक्शन मिळाले आहे. गरजु रूग्णांनाच रेमेडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे या इजेंक्शनचा काळाबाजार होत असल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड मृतकांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार करावे असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. कोविड रूग्णांच्या सेवेसाठी अंतिम वर्ष डॉक्टर,नर्सिंग स्टाफची मदत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर प्रतिबंध करण्यासाठी काही कडक निर्बंध उदयापासून अंमलात येणार आहे. औषधीची दुकाने वगळता इतर अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सूरु राहतील त्यासाठीचे सविस्तर आदेश महानगरपालिका आयुक्त निर्गमित करतील. नागरिकांनी कोविड त्रिसुत्रीचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्वाच्या सहकाऱ्याने कोविडच्या संकटावर मात करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491