वरठीमध्ये नरभक्षक कुत्र्यांचा हैदोस
वरठी, ता. मोहाडी, जि. भंडारा
वरठी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. काल रात्री वरठी येथील आंबेडकर वॉर्डामध्ये घडलेल्या भयावह घटनेत एका तीन वर्षीय बालकावर भटक्या नरभक्षक कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्या बालकाच्या हाताचे एक बोट कुत्र्याने चावून खाल्ले, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, वरठी गावात गेल्या काही दिवसांपासून भटक्या नरभक्षक कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून एखादा व्यक्ती रस्त्यावर एकटा दिसला की हे कुत्रे लगेच त्याच्यावर तुटून पडतात. अशा प्रकारचे हल्ले रोजच गावातील विविध भागांत होत आहेत.
या घटनांमुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. अन्यथा आणखी गंभीर अनर्थ घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
—
