वरठीत मुख्य मार्गावरील चार दुकानांत चोरी
वरठी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील वर्दळीच्या मुख्य महामार्गावर अज्ञात चोरांनी दुकानावर डाव साधला. या भागातील ४ दुकानांत जबरी चोरीचा प्रयत्न झाला. पण, चोरांचा अंदाज चुकल्याने दुकानातील किरकोळ रक्कम व वस्तूवर हात साफ केले. सदर घटना शनिवारी पहाटे झाल्याचा अंदाज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बसस्थानक ही वरठीची मुख्य बाजारपेठ आहे. रेल्वेस्थानक व बसस्थानक सदर मार्गावर असल्याने दिवसरात्र या रस्त्यावर रेलचेल पाहावयास मिळते. रात्रभर धावणाऱ्या प्रवाशी रेल्वेगाड्या व प्रवाशांची वर्दळ असल्याने या मार्गावर सर्वाधिक बाजारपेठ व दुकाने आहेत. शनिवारच्या पहाटे १:३० वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी या भागातील दुकानांवर डल्ला मारला. यात डॉ. आंबेडकर चौकातील लस्सी व आइस्क्रीम दुकान यासह हार्डवेअर, स्टेशनरी व किराणा दुकान फोडले. मात्र दुकानात रोकड किंवा किमती सामान
नसल्याने चोरांचा जबरी चोरीचा डाव फसला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली असल्याने लवकरच चोरांचा शोध लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. पोलिस निरीक्षक नीलेश गिरी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा तयार केला असून चोरीच्या शोधासाठी भंडारा येथील श्वानपथकाला पाचारण केले होते.
व्यापाऱ्यांची ठाण्यावर धाव
१५ दिवसांत दोनवेळा गावात जबरी चोरीच्या घटनेने त्रस्त व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर धाव घेतली. यावेळी व्यापारी संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पोलिस ठाण्यात तक्रारीचा पाढा वाचला. रात्री गावात गस्त वाढवून सुरक्षा देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. यावेळी पोलिस निरीक्षक नीलेश गिरी यांच्यासह सरपंच चांगदेव रघुते, राष्ट्रवादीचे नेते अरविंद येळणे, विवेक मोटघरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष चेतन डांगरे, रुपेश गाढवे, संजय मिरासे, कृष्णा भुजबळ, हेमंत मलेवार, मुकेश कांबळे, राजेश साठवणे, कल्पेश साकुरे, इंदूर सहजसंघानी, दीपक मदान, किशोर सेलोकर उपस्थित होते.
